


शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत – काशिनाथ नखाते

पिंपरी, दि.१ – महाराष्ट्र राज्यात जेथे कोणतेही वाहन पोहोचणे शक्य नाही अशा ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस सुरू केल्याने राज्यातील दुर्गम खेडी, आदिवासी पाडे, डोंगरदऱ्या, छोटी गावे, ग्रामीण भाग यांना शहराशी जोडण्याची काम केले, याला आज ७८ वर्षे पूर्ण झाले. बस अखंडितपणे सुरू आहे यात एसटी कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे म्हणून एसटी वाहनचालक व वाहक यांचा सत्कार आज वल्लभनगर एसटी स्टँड येथे करण्यात आला.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज वल्लभनगर आगार येथे चालक, वाहक सन्मान करण्यात आला. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, सतीश मरशेट्टी, शमशुद्दीन शेख, लाला राठोड, विजय जाधव उपस्थित होते.
एसटी ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील गावे एकमेकांना जोडण्यासाठी महत्त्वाची ठरत असून सांस्कृतिक, आर्थिक जीवनासह, सामाजिक जीवनामध्ये बदल घडवण्यात महत्त्वाचा वाटा ठरत आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती, विद्यार्थीनी, विद्यार्थ्यांचे शिक्षण व शेतकऱ्यांना बाजारपेठेची, रुग्णांना उपचार घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
१ जून १९४८ रोजी सुरू झालेल्या एसटी वर अनेक संकट आले आहेत मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटीच्या सर्व कर्मचारी आणि कामगार यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळ परिवहन सेवा उभी आहे, हे काम अविरतपणे सुरू ठेवणाऱ्या कर्मचारी, कामगार यांना थकित महागाई भत्ता, वेळेवर पगार करणे, वेतन वाढीतील फरकाची रक्कम, कंत्राटी ऐवजी नियमित कर्मचाऱ्यांची भरती, कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे त्यांच्या मागण्या कडे सरकारने लक्ष देऊन मंजूर करणे गरजेचे आहे असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
