


पिंपरी दि.९ – देशभरातील आणि राज्यातील कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ४ श्रमसंहिता नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. हा कामगार वर्गावर फार मोठा हल्ला असून कामगारांचे कामाचे तास ८ तासावरून १२ करण्यात आलेले आहेत. याला विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील कामगारांनी १२ फेब्रुवारी २०२६ च्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कर्मचारी संघटना कृती समिती महाराष्ट्र, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा- टॅक्सी महासंघ, कामगार कामगार महासंघ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, सदस्य राजू बिराजदार, निमंत्रक बालाजी लोखंडे, सुनील भोसले, नंदू आहेर, कमल लष्करे,सुनीता दिलापाक, वत्सला जाधव, निर्मला कुंभार, अनिता देसाई, अर्चना कांबळे, आदी उपस्थित होते.
राज्यातील कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ले होत असून कायमस्वरूपी कामगारांना हंगामी स्वरूपात आणण्याचे काम या कायद्यानुसार होणार आहे. संघटना कमजोर करण्याचाही प्रकार सरकारकडून चालू आहे, भांडवलधार्जिन्या धोरणाने कामगारांना संकटाच्या खाईत टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे येत्या १२ तारखेला सहभागी होण्याचे आवाहन नखाते यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
