


९२ लाखांहून अधिक अपात्र ठरवलेल्या महिलांचा प्रश्न सरकारसमोर

पिंपरी, दि. १० : राज्यातील लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या ९२ लाखांहून अधिक महिलांचा प्रश्न कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या ‘लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा’च्या माध्यमातून सरकारसमोर ठामपणे मांडण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत महिला व बाल विकास विभागाकडून चर्चेसाठी बोलावण्यात आले.
त्यानुसार महासंघाच्या शिष्टमंडळाने महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची मंत्रालयात भेट घेऊन विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ‘लाडक्या बहिणींसाठी सकारात्मक निर्णय घेऊ’, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले.
लाडकी बहीण योजनेतील पात्र व गरजू महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळावा, e-KYC किंवा तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना पुन्हा संधी द्यावी, निराधार, विधवा व परित्यक्त्या महिलांसाठी मदतीच्या रकमेत वाढ करावी, तसेच असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांना योजनेत प्राधान्य द्यावे, अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. या मागण्यांवर राज्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, चेतन गायकवाड आणि संजय शिंदे उपस्थित होते.
याबाबत प्रतिक्रिया देताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले, आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत, लाडकी बहीण योजनेत खऱ्या अर्थाने गरजू महिलांचा समावेश करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, हा केवळ एका योजनेचा प्रश्न नसून गरजू महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा आणि सामाजिक न्यायाचा विषय आहे. सदरच्या योजनेतून मिळणाऱ्या लाभांमुळे अनेक महिलांनी वर्ष दोन वर्षाचे आर्थिक नियोजन केलेले आहे ते नियोजन पूर्ण ढासाळे असल्याचे नखाते म्हणाले. तसेच कामगार महिलांच्या सक्षमीकरणांमध्ये कष्टकरी संघर्ष महासंघ प्रयत्नशील राहील त्यामुळे पात्र एकही महिला वंचित राहू नये, यासाठी संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही सुरूच राहिल असेही काशिनाथ नखाते म्हणाले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
