


चिंचवड विधानसभेत ‘महिला राज’चा भाजपाचा बोलबाला

:
वाकड, ता. २२ : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा केवळ आकड्यांचा खेळ न राहता, आगामी सत्तास्थापनेच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरत आहे. तब्बल १३ प्रभागांमध्ये भाजपच्या महिला उमेदवारांनी विजय मिळवत हजारो मतांची आघाडी घेतली आहे, यामुळे आता महापौरपदी अथवा समान दर्जाच्या पदावर महिलांना संधी देत भाजपा ‘महिला राज’ आणणार का? असा प्रश्न चर्चेत आहे.
प्रभागनिहाय कंसात मिळालेल्या मताधिक्यासह पाहता, प्रभाग २६ मध्ये स्नेहा कलाटे (१४,३४९), आरती चोंधे (५,८६०) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. प्रभाग २५ मध्ये श्रुती वाकडकर (१०,८१४), रेश्मा भुजबळ (१४२५७) यांनी दमदार कामगिरी केली. प्रभाग १८ मध्ये अपर्णा डोके (९५४३), मनिषा चिंचवडे (९८०२) यांनी जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित केला. प्रभाग १७ : आशा सूर्यवंशी (४५२३), प्रभाग २२ : निता पाडाळे (७,७३३), प्रभाग २८: कुंदा भिसे (८१६२), प्रभाग २९: रविना अंघोळकर (७६१४), प्रभाग २७ : सविता खुळे (२२५४), प्रभाग ३१ : पल्लवी जगताप (४,९६४) व ३२ : तृप्ती कांबळे : (४२९७) या भाजप महिला उमेदवारांनी आपापल्या प्रभागात विजय मिळवत पक्षाचा झेंडा रोवला आहे.
चिंचवड विधानसभेत भाजपला मिळालेल्या यशाकडे केवळ निकाल म्हणून न पाहता, महिला नेतृत्वावर जनतेने दाखविलेल्या ठाम विश्वासाची दखल घ्यायला हवी.
राजकीय जाणकारांच्या मते,
“इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी मताधिक्य मिळवून जिंकणे म्हणजे भाजपसाठी एक सुवर्णसंधी आहे. जर पक्षाने महापौरपदी महिलेला संधी दिली, तर तो केवळ राजकीय निर्णय न राहता, सामाजिक संदेश ठरेल.” महिला सशक्तीकरण, निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग आणि नेतृत्वाची संधी या मुद्द्यांवर भाजप नेहमीच आक्रमक भूमिका घेत आला आहे. त्यामुळे आता महापौरपद महिला उमेदवाराकडे सोपवून भाजप ‘महिला राज’ची मुहूर्तमेढ रोवणार का, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवडचे लक्ष लागले आहे.
स्नेहा कलाटेंचा ऐतिहासिक विजय, शहरात सर्वाधिक मताधिक्य
शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख, विशाल नगर ह्या प्रभाग २५ मधून भाजपच्या महिला उमेदवार स्नेहा कलाटे यांनी शहरातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला. विशेष बाब म्हणजे त्या नवख्या उमेदवार असूनही त्यांनी अनुभवी राजकीय प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत जनतेचा प्रचंड विश्वास संपादन केला.
त्यांचा हा विजय नव्या विचारांचा, स्वच्छ प्रतिमेचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा विजय मानला जात आहे. प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर थेट संवाद साधत, महिलांचे प्रश्न, युवकांचे भवितव्य, पायाभूत सुविधा, पाणी, वाहतूक व स्वच्छतेसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. त्यांची साधी, स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका मतदारांच्या मनाला भिडली.
या ऐतिहासिक यशामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची आशा निर्माण झाली असून महिलांसाठी आणि नवोदितांसाठी हा विजय प्रेरणादायी ठरत आहे. चिंचवड विधानसभेतील हा निकाल स्पष्टपणे सांगतो की मतदारांनी महिलांवर विश्वास टाकला आहे. आता हा विश्वास महापौर अथवा समदर्जा पदाच्या निर्णयातून साकार होतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
