


कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व; भारत सात पदकांसह उपविजेता ठरला

पिंपरी चिंचवड, ४ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माऊंटेनियरिंग फाउंडेशन (IMF) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचा आज उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय वातावरणात समारोप झाला.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकत देशाचा मान उंचावला, तर दक्षिण कोरियाने १८ पदकांसह (७ सुवर्ण, ७ रौप्य, ४ कांस्य) वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकावले.
१३ आशियाई देशांतील १६० हून अधिक बाल खेळाडूंनी या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभाग घेतला. अंडर-१३ आणि अंडर-१५ गटातील मुला-मुलींनी लीड, बोल्डर आणि स्पीड या तीन प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली.
लीड आणि बोल्डर प्रकारात कोरियन खेळाडूंनी दमदार वर्चस्व राखले, तर भारतीय खेळाडूंनी स्पीड प्रकारात सर्व पदके जिंकत इतिहास रचला. विशेषतः अंडर-१३ मुलांच्या गटात भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी सर्व पदके पटकावली, तर अंडर-१३ मुलींच्या गटात सुवर्ण आणि रौप्य मिळवले.
जपानच्या खेळाडूंनीही बोल्डर आणि लीड प्रकारात प्रभावी कामगिरी केली. महाराष्ट्र आणि झारखंडमधील खेळाडूंनी भारताच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
समारोप समारंभात महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके म्हणाले —
“पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात आलेले क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हे देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे आमचे ध्येय आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची सात पदकांची कामगिरी, विशेषतः पुण्याच्या ध्रुवीने मिळवलेले पदक, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
आयएफएससी आशियाई ज्युडजेस कमिशनचे प्रमुख श्रीकृष्ण कडूसकर यांनी सांगितले —
“आशियाई चॅम्पियनशिपचे यशस्वी आयोजन करणे ही मोठी समाधानाची बाब आहे. हा उपक्रम ‘मिशन ऑलिंपिक 2036’ च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रात क्लाइंबिंग संस्कृती विकसित करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
२००० मध्ये चिंचवड येथील अण्णासाहेब मागर स्टेडियमपासून, २०१० मध्ये राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल (शिवाजीनगर) पर्यंतचा प्रवास आणि आता योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील या जागतिक दर्जाच्या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचणे हा प्रेरणादायी प्रवास आहे. परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी या सुविधेचे कौतुक करत ‘वर्ल्ड कप’ दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे केंद्र नक्कीच मिशन ऑलिंपिकसाठी नवी दिशा ठरवेल.”

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
