


पिंपरी चिंचवड मध्ये ४ नोव्हेंबर पर्यंत स्पर्धा रंगणार, १३ देशातील २०० खेळाडूंचा सहभाग

पिंपरी चिंचवड, ता. २ नोव्हेंबर — पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५चा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत जल्लोषात, मोठ्या उत्साहात पार पडला. देश-विदेशातील खेळाडू, मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात वातावरण उत्साहाने भारावून गेले. मान्यवरांच्या हस्ते बलून आकाशात सोडण्यात आले आणि त्या क्षणी संपूर्ण परिसरात जल्लोषाचा माहोल पसरला.
या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. १ ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा पार पडत आहे. यात १३ देशांतील सुमारे २०० युवा खेळाडू सहभागी झाले आहेत.
उद्घाटन प्रसंगी आमदार श्री शंकरभाऊ जगताप, श्री. शत्रुघ्न (बापु) काटे, शहराध्यक्ष भाजप पिंपरी चिंचवड शहर, श्री. विठ्ठल (नाना) काटे (माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड मनपा), कर्नल विजय सिंग (Retd), VSM, अध्यक्ष IMF, विलास पाडळ (उपायुक्त महापालिका), डॉ. राधिका पाटील, विजय कुमार खोराटे (अतिरिक्त आयुक्त, महापालिका ), श्री. सुरेंद्र शेळके( महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन) श्री.किर्ती पायस (सचिव , आयएमफ), रासिप इसनिन (Secretary General, IFSC Asia), श्री. श्रीकृष्ण कडुसकर आणि श्री.सागर पालकर (संकल्पक, क्लाइंबिंग सेंटर)
उद्घाटन सोहळ्यावेळी आमदार श्री. शंकरभाऊ जगताप म्हणाले, “महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप आयोजित होत आहे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र आणि भारतातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळेल. भविष्यातही पालिका अशा स्पर्धांना संपूर्ण पाठबळ देईल.”
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक स्वागतगीत “We will rock you” वर जोशपूर्ण नृत्याने झाली. त्यानंतर सादर झालेल्या कथक नृत्याने समारंभाला संस्कृतीचा ठसा दिला. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला, तर पंजाबी वाद्यांच्या जोशपूर्ण तालावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नृत्याचा आनंद घेतला. विविध रंगी वेशभूषेत सजलेले कलाकार आणि नृत्यसमूह यांनी उद्घाटन सोहळ्याला कलात्मक आणि भव्य स्वरूप दिले.
इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनचे सचिव किर्ती पायस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले चढाईचा वारसा महाराष्ट्राने जगाला दिला. आज तोच वारसा आधुनिक स्पोर्ट क्लाइंबिंगच्या माध्यमातून आपण सादर करत आहोत. ही स्पर्धा केवळ खेळ नाही, तर आपल्या इतिहास आणि परंपरेचा सन्मान आहे.”
आयएमएफचे अध्यक्ष कर्नल विजय सिंग यांनी सांगितले की, “भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्लाइंबिंग स्पर्धा होणं हे मोठं यश आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना ऑलिंपिक दर्जाच्या प्रशिक्षणाचा अनुभव मिळेल. पिंपरी चिंचवड मध्ये असलेली हे स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स वर्ल्ड कप स्पर्धा भरविण्यासाठी अत्यंत योग्य आहे .”
महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके म्हणाले, “पिंपरी चिंचवडमध्ये उभारलेला स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील सर्वात अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रामुळे महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील.”
योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स स्मार्ट सिटी मिशनच्या मदतीने उभारला गेला आहे. येथे अत्याधुनिक रूट्स, सुरक्षा प्रणाली, आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आयोजकांच्या मते, हा प्रकल्प “मिशन ऑलिंपिक २०३६” साठी महत्त्वाची पायरी ठरेल.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
