


अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट भरघोस अर्थसहाय्य देण्याची मागणी

शेतकरी नुकसानात, कामगार मैदानात
पिंपरी दि. २७. – महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून राज्यात सुमारे २४ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.
यात सुमारे २ लाख २३ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा प्रचंड फटका बसलेला आहे. काळ संकटाचा असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निकषाचा डोंगर उभा न करता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड, पुणे येथे कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिला अध्यक्ष माधुरी जलमूलवार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, किरण साडेकर,महादेव गायकवाड,किसन भोसले, नंदा जाधव, उज्वला साळुंखे,वंदना राऊत,सुरेखा भुस्कुटे, उज्वला चव्हाण,ललिता माळी, मंदा डोंगरे,साधना हेवळकर, रमाकांत अडागळे, अविनाश गिरी, बाबा मराठे, सोमनाथ सोमवंशी प्रचंड संख्येने उपस्थित होते.
नखाते म्हणाले की, ऐन दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना झालेले हे मोठे नुकसान सहन करण्यासारखे नाही. म्हणूनच सध्या बहुतांशी ठिकाणी आत्महत्याचे प्रमाण अधिक झालेले आहे. बीडचे रमेश गव्हाणे यांनी विजेच्या तारेला स्पर्श करून जीव दिला, धाराशिवचे लक्ष्मण पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, सोलापूरचे शरद भागवत गंभीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी अनेक उदाहरणे देता येतील, या संकटाच्या काळात त्यांचा जीव वाचवून शेतकऱ्यांना धीर आणि दिलासा देणे गरजेचे आहे.
सरकार म्हणून आपण बांधावर आहात आणि शेतकरी आशेवर आहे, आपण पाहणी करताना मदतीसाठी प्रत्येक शब्दाकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे, मात्र नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करताना आता निकषाचा डोंगर उभा करून मदत न देणे टाळणे योग्य नाही.
सरकारकडून नुकसान भरपाई देण्यासाठी जीपीएस अद्यावत असलेला फोटो, ई पीक पाहणी केलेली नोंदणी, ॲग्रीस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक अशा प्रकारची बंधनं घालण्यात आलेले आहेत. यामुळे हा निकषाचा डोंगर पार करता – करता अनेक शेतकरी यातून बाजूला जातील, वंचित राहतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. सध्याचे संकट मोठे आहे, प्रसंगी सरकारवर अजून कर्ज झाले तरी चालेल मात्र जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज बुलंद केला. मदत करा शेतकऱ्यांना मदत करा, शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून २५ हजार रुपये द्या, शेतीपिक, पशुधन नुकसान भरपाई त्वरित द्या या घोषणा देण्यात आल्या.
१) राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी.
२) शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
३) शेतकऱ्यांना निकषाची अट न लावता सरसकट नुकसान भरपाई द्यावी.
४) अतिवृष्टीत पडलेल्या घरांसाठी भरघोस मदत द्यावी
५) गाय, म्हैस, बैल, घोडा, उंट, शेळी, मेंढी अशा मृत जनावरांना भरघोस मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटात मदत करावी.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
