


दिनांक – २३/०९/२०२५ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील (पिंपरी-चिंचवड शहर निरीक्षक), शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, निरीक्षक प्रकाश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण चर्चा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणूक व शहरातील समस्या या संदर्भात चर्चा झाली.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करणे योग्य नसून कॅप्टन तुषार कामठेच राहतील. तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील (पिंपरी-चिंचवड शहर निरीक्षक), माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी एकत्र बसून पुढील नियोजन करावे आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे सूचित केले. शहरात खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील (पिंपरी-चिंचवड शहर निरीक्षक) विशेष लक्ष देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याच बैठकीच्या अनुषंगाने आज दिनांक २४/०९/२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष नेते व खासदार मा. डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला.
या पत्रकार परिषदेवेळी शहरासमोरील विविध प्रश्न, जनतेच्या अपेक्षा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील भूमिका, घडामोडी तसेच आगामी राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित विषयांवर खासदार डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
पत्रकार संवादात त्यांनी पुढील मुद्द्यांवर भर दिला :
- शहरात लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या मदतीसाठी जनता दरबार घेऊ शकत नाही, कारण महायुती सरकारने २०१८ च्या जी.आर. नुसार संबंधित खात्याचे मंत्री वगळता कोणत्याही लोकप्रतिनिधींना जनता दरबार घेता येणार नाही. तसेच अशा जनता दरबाराला शासनाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची गरज नाही, असा जी.आर. काढल्याने जनता दरबार घेण्याला अर्थ उरत नाही.
- प्रशासक यांच्यासोबत लवकरच पक्ष पदाधिकाऱ्यांच्या समवेत महानगरपालिकेत जाऊन शहरातील समस्यांबाबत संवाद साधला जाणार आहे.
- प्रशासकांवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सरकारचा वचक नाही का? की त्यांच्याच सांगण्यावरून प्रशासक हे निर्णय घेत आहेत, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
- पिंपरी-चिंचवड शहराला कर्जबाजारी कोणी केले? कोणाच्या आशीर्वादाने महानगरपालिका कर्जबाजारी झाली? हे लवकरच जनतेसमोर मांडणार.
- शहरात टँकर लॉबी वाढली असून जाणूनबुजून शहरातील लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण करून त्रास दिला जात आहे. नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा जसे की पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यामध्ये भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पक्ष स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहोत व करत राहणार आहोत.
- शहरातील SRA चा प्रश्न वाढत असून या संदर्भात देखील लवकरच बिल्डरधार्जिण्या नेत्यांचे लागेबांधे उघड करू.
- मराठवाड्यातील ओला दुष्काळ अत्यंत गंभीर असून सरकारने पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. गुरे-ढोरे वाहून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचीही बाजारभावानुसार भरपाई करावी.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
