


आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिकेच्या सहकार्याने उपक्रम

पिंपरी चिंचवड, ता. ३१: प्सालाबादप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकारातून रहाटणीतील श्री गणेश भक्तांसाठी विसर्जनासाठी कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने रहाटणी लिंक रोडवरील छत्रपती चौक येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम हौद आणि श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, “गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. POP मूर्ती आणि प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाचा पर्याय निवडावा. पर्यावरण संवर्धन आणि गणेश भक्तांचा उत्साह यांचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम आहे. नागरिकांनी या पर्यावरणपूरक विसर्जन घाटाचा लाभ घेऊन गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
बाबासाहेब त्रिभुवन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रहाटणीकरांनी आपल्या घरगुती दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आणि मूर्ती संकलन या केंद्रात केले. त्रिभुवन यांनी पुढील पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठीही नागरिकांना या संकलन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत गणरायाचे आणि नदीचे पावित्र्य राखले जावे, असे त्यांनी नमूद केले.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासह गणेशोत्सवाच्या पवित्र परंपरेला प्रोत्साहन देणारा ठरला असून, रहाटणीतील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
