


पिंपरी चिंचवड, ता. 30 : भाजपमध्ये गेली ३० वर्षे सक्रीयपणे कार्यरत असलेले संतोष भाऊसाहेब तापकीर यांनी संघटनेतील अन्यायकारक वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शहर कार्यकारिणीत अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

तापकीर यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, “माझे वडील कै. भाऊसाहेब ज्ञानेश्वर तापकीर हे पक्ष स्थापनेपासून एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांचा वारसा पुढे चालवत मी आंदोलनं, मोर्चे, संघटनात्मक कामे अतिशय प्रामाणिकपणे केली आहेत. पक्षाने आजवर मला मंडल सरचिटणीस, दोन वेळा मंडल अध्यक्ष, किसान मोर्चा शहराध्यक्ष, शहर उपाध्यक्ष व शहर चिटणीस अशी जबाबदारी दिली. मात्र या नव्या शहर कार्यकारिणीत मला शहर सरचिटणीस पद न देता माझे खच्चीकरण करण्यात आले आहे.”
पक्ष सत्तेत नसताना त्यागाची भावना ठेवून अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले की, “सन २०१४ पासून पक्षाला केंद्र, राज्य आणि शहरात सत्ता असली तरी कार्यकर्त्यांना लाभाच्या पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा वेळी जर संघटनेतही खच्चीकरण होत असेल तर हा कार्यकर्त्यांचा मोठा अपमान आहे. संघटनेवरचा विश्वास उडालेला आहे.”
तापकीर यांनी दोन दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास पक्ष कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे भाजप शहर संघटनेत खळबळ उडाली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
