


मेट्रोच्या कामामुळे अपघातांचा धोका वाढला, महिलांना दुखापती – प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप

पिंपरी चिंचवड, ता. १४ – निगडी ते बजाज गेट समोरील आकुर्डीमार्गे पुण्याकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता सध्या पूर्णपणे उध्वस्त झाला असून नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. या मार्गावर पुणे मेट्रोचे काम सुरू असून, त्याच्याशी संबंधित कामे अत्यंत असमाधानकारक पद्धतीने व सुरक्षिततेचा विचार न करता सुरू ठेवली जात आहेत. परिणामी, संपूर्ण रस्त्याची अवस्था धोकादायक झाली आहे.
खड्डे, धूळ, अनियमित वाहतूक आणि अपूर्ण रस्ते – यामुळे नागरिकांना दररोज अपघात, वेळेचा अपव्यय व आरोग्यावर परिणाम अशा त्रासांचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर महिला दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध आणि सामान्य कामगार प्रवास करतात. नुकत्याच काही महिलांना खड्ड्यांमुळे अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
प्रशासन आणि मेट्रो प्रकल्प यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.
रस्त्यावर कुठेही चेतावणी फलक, वाहतूक नियंत्रण यंत्रणा, पथदिवे किंवा वैकल्पिक मार्गांची व्यवस्था नाही. पावसाळा सुरु होऊनही रस्त्याची डागडुजी केलेली नाही. अशा स्थितीत नागरिकांच्या जीविताला आणि आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या या दुर्लक्षाच्या कारभाराचा आम्ही तीव्र निषेध करतो.
या विषयावर सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नागरिकांच्या वतीने आम्ही खालीलप्रमाणे मागणी करीत आहोत:
📌 आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –
- निगडी ते आकुर्डी रस्त्याचे तातडीने सखोल दुरुस्तीकरण करण्यात यावे.
- मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी समांतर मार्ग व स्पष्ट सूचना फलक लावावेत.
- अपघात संभाव्य ठिकाणी सुरक्षा रक्षक, वाहतूक नियंत्रण पथक व वैध संकेत लावावेत.
- पुणे मेट्रो, पीसीएमसी आणि स्थानिक नागरिक यांच्यात नियमित समन्वय बैठका आयोजित करून समस्यांवर त्वरित निर्णय घ्यावा.
- या भागातील नागरिक, व्यापारी, शालेय पालक आणि वाहनचालक यांच्याकडून तक्रारी घेऊन सुधारणा कराव्यात.
या मागण्या पूर्ण न झाल्यास, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येतो.
या निवेदनाचे पुढाकारदार पुढीलप्रमाणे आहेत:
🔹 सुनिल मल्हारी कांबळे – सचिव, सामाजिक न्याय विभाग
🔹 अभिजीत जाधव
🔹 दत्तात्रय हिरणाईक
🔹 सनी सुभाष पवार
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गट, पिंपरी चिंचवड शहर)
– सुनिल कांबळे
सचिव, सामाजिक न्याय विभाग,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट),
पिंपरी चिंचवड शहर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️