


मा. गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन धर्म व धर्मांतराविरोधातील भडकावू वक्तव्यांविषयी, आंबेडकरी चळवळीच्या प्रतीकांचा चुकीच्या पद्धतीने वापर, आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या वैयक्तिक जीवनाबाबत असभ्य टीका – यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईसाठी राष्टवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांचे तक्रारी निवेदन

पिंपरी चिंचवड, ता.९: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य मा. गोपीचंद पडळकर हे सातत्याने ख्रिश्चन धर्म, धर्मांतरण, आणि अल्पसंख्यांक समाज यांच्याविरोधात भडक आणि द्वेषमूलक वक्तव्ये करत आहेत. ही वक्तव्ये समाजात धार्मिक तेढ, गोंधळ, आणि अल्पसंख्यांकांविषयी द्वेषभावना निर्माण करणारी असून, महाराष्ट्रातील धार्मिक सलोख्याला आणि संविधानिक मूल्यांना आव्हान देणारी आहेत.
दिनांक 08 जुलै 2025 रोजी मुंबई येथे आयोजित निषेध सभेत मा. पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माचा निषेध करताना, आंबेडकरी समाजाचे प्रतीक असलेले निळे झेंडे आणि निळी टोपी वापरून, त्या प्रतीकांच्या आड लपून द्वेषमूलक विधान केले. हे अत्यंत गंभीर असून, समाजातील शांतता व सलोखा धोक्यात आणणारे आहे.
यापलीकडे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकास दिलेल्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे (अनुच्छेद 25 नुसार) सरळ सरळ उल्लंघन करत आहेत. त्यांचे विधान हे संविधानाचा अवमान करणारे असून, त्यांच्या या भूमिकेमुळे संविधानाच्या तत्वांवर आघात होत आहे.
याच सभेत त्यांनी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कुटुंबातील आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांची खिल्ली उडवली आणि अश्लील व अपमानास्पद भाषा वापरून त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा अपमान केला. हे पूर्णतः निंदनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांचे समर्थन केले होते. त्यांच्या हाच विचार प्रत्यक्षात उतरवणारे आदर्श शरद पवार साहेब यांच्यावर अशा प्रकारे टीका करणे, म्हणजे संविधानिक अधिकारांची व सामाजिक समतेच्या तत्वांची थट्टा होय.
मा. गोपीचंद पडळकर हे एक संविधानिक पद भूषवणारे व्यक्ती असूनही, समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, अल्पसंख्यांक व बहुजन समाजात फूट पाडणे, आणि समाजसुधारणेच्या प्रतीकांची बदनामी करणे यासारख्या गंभीर वर्तनात सहभागी होत आहेत. अशा व्यक्तीवर त्वरित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
म्हणून आम्ही खालील मागण्या करतो:
1.मा. गोपीचंद पडळकर यांच्यावर IPC कलम 153-A, 295-A, व इतर संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
2.धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या वक्तव्यांसाठी सखोल चौकशी करून त्यांच्या आमदारकी रद्द करण्यात यावी.
3.आंबेडकरी प्रतीकांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
सदर विषयाचे निवेदन राष्टवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,पोलीस महासंचालक,अनुसूचित जाती जमाती आयोग यांना मेल;द्वारे निवेदन देण्यात आले.
आपला नम्र,
धम्मराज नवनाथ साळवे
वरिष्ठ उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद पवार
पिंपरी-चिंचवड शहर
8087540384

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️