


पिंपरी-चिंचवड, ता. १: स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अगदी समोर, फिनोलेक्स चौक, मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारावर, पिंपरी चौक, मोरवाडी, तसेच सर्रास शहरभर अनधिकृत टपरी बिनदिक्कतपणे थाटण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, या टपरीतून सर्रासपणे पान, तंबाखू, गुटखा आणि सिगारेटची विक्री होत असून, सायंकाळी येथे शेकडो लोक धूम्रपान करताना दिसतात. ही टपरी मनपाच्या अतिक्रमण विभागालाच उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे.
आश्चर्यचकित बाब म्हणजे या टपऱ्याना महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवड मनपा प्रशासनाला या गंभीर प्रकाराचा काडीचाही फरक पडत नसल्याचे दिसून येते. नागरिकांच्या मते, महापुरुषांच्या नावाचा राजरोस अपमान सुरू असतानाही महापालिका डोळेझाक करत आहे, हे अनाकलनीय आहे.
पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह
एकीकडे वाहतूक पोलीस अनधिकृत पार्किंग केलेल्या दुचाकी उचलून नेतात, दुसरीकडे टपरीला मात्र हात लावत नाहीत. सायंकाळी तर या टपरीजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी होते, ज्यामुळे चौकात आणखी वर्दळ वाढते आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘स्मार्ट’ कारभाराची खिल्ली?
या परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट’ कारभाराला आणि आयुक्तांच्या ‘स्मार्ट व्हिजन’ला दाद द्यावी की त्याची खिल्ली उडवावी, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काही जणांनी उपहासाने असेही म्हटले आहे की, कदाचित आयुक्त प्रायोगिक तत्त्वावर ‘अतिक्रमण प्रोत्साहन’ उपक्रम राबवत असावेत आणि भविष्यात अशाच टपऱ्या सर्व मेट्रो स्टेशनवर टाकण्यासाठी प्रोत्साहन देतील!
शहर विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होत असताना, शहराच्या मध्यभागी आणि महापालिकेच्या डोळ्यासमोरच अशा प्रकारे अनधिकृत टपऱ्या कशा थाटल्या जातात आणि त्यांना कोणाचे अभय मिळते, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. यावर मनपा प्रशासन काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️