


पिंपरी चिंचवड, ता. १: संत ज्ञानेश्वर महाराज यांची पंढरपूरच्या दिशेने निघालेली पालखी आज फलटणला आहे.तर संत तुकाराम महाराज यांची पालखी इंदापूरला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेलं भक्तिमय वातावरण आहे.

तोंडाने विठ्ठलनामाचा गजर करत आणि मनात “विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ!” हा भाव ठेवत हजारो वैष्णवांची दिंडी पंढरीला निघाली आहे.
विठ्ठल हे बहुजन कष्टकर्यांचे दैवत. इतर देवांसारखा नवस ज्याला कधीही बोलला जात नाही. संतपरंपरेने उपासना पध्दतीतील कर्मकांडाचे अवडंबर नाकारले. ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा ‘ असं म्हणत, देवा मधला मध्यस्थ नाकारत भक्त आणि पांडुरंगाचे थेट नाते जोडले. एवढेच नव्हे तर “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी!” असे म्हणत
“कर्म हीच भक्ती” ही साधी सोपी पण अतिशय महत्वाची शिकवण रुजविली.
‘ वारी ‘ हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक आणि खरा अध्यात्मिक सोहळा. हा वारीचा अनुभव आता सातासमुद्रापार इंग्लंडमधील मराठी कुटुंबामध्ये अनुभवला जात आहे.आणि त्याला निमित्त आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचे….
१४ एप्रिल रोजी पंढरपूरातील विठ्ठल मंदिरातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या. लंडन मधील विठ्ठल भक्त श्री अनिल खेडकर यांनी 22 देशातून सत्तर दिवसांत सोळा हजारहून जास्त किलोमीटरचा प्रवास करून या पादुका नुकत्याच इंग्लंड मध्ये आणल्या आहेत. इंग्लंडमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे पहिले भव्य मंदिर बांधण्याचे नियोजन या मंडळींनी केले आहे.
आता या पादुका सगळ्या इंग्लंडभर जिथे जिथे मराठी माणसे आहेत त्या शहरात या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. थेट विठ्ठलाच्या पादुका आपल्या दारी अशी योजना या मागे आहे.
वॉरिक येथील ‘ लॅमिंग्टन स्पा ‘ मधील ‘ कॅम्पियन स्कूल ‘ मध्ये या विठ्ठलाच्या पादुका आज रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन लॅमिंग्टन मराठी या इथल्या मराठी लोकांनी सुरू केलेल्या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
१४ एप्रिल रोजी जेव्हा या पादुका पंढरपूरहून लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या त्या पंढरपूरच्या देवळात झालेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. लंडन मध्ये स्थायिक असलेला आणि मुंबईत घाटकोपर मध्ये पूर्वी शेजारी असलेला माझा मित्र संतोष पारकर याने मला या पंढरपूर – लंडन वारी मध्ये सहभागी करून घेतले. या वारीचे आणि मंदिराचे नियोजन केलेल्या पैकी अनिल खेडकर,संतोष पारकर, भागवत नागरगोजे, सतीश कापशीकर ही लंडनहून आलेल्या मंडळीची भेट झाली.त्यांचा प्रयत्न समजून घेता आला.
त्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात या पादुकांच्या आरती सोहळ्यात मला सहभागी होता आले आणि आज 83 दिवसांनी इंग्लंड मधील लॅमिंग्टन मराठी च्या कार्यक्रमात पादुकांचे दर्शन घेता आले आणि या सोहळ्यात सहभागी होता आले.
दुपारी 3 वाजता ‘लॅमिंग्टन स्पा ‘ मधील अनेक मराठी कुटुंब एकत्र जमली होती. पालखी सजली होती त्यात पादुका आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवल्या होत्या. हातात पताका घेतलेला तरुण होता. छोटी मुले सगळ्यात पुढे वेशभूषा करून उभी होती. ढोल ताशाच्या गजरात पालखीला सुरुवात झाली. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला दिसत होत्या.कपाळावर गंध, डोक्यावर टोपी आणि पारंपरिक वेश परिधान करून मराठी मंडळी कुटुंबासहित दिंडी मध्ये सामील झाली होती. पुढे शाळेच्या मोकळ्या मैदानात एक ‘रिंगण ‘ झाले. महिलांनी फुगड्या घातल्या.पंढरपूरच्या वाटेवर नातेपुते येथे होणाऱ्या रिंगणाची आठवण झाली.
शाळेच्या हॉल मध्ये पादुका ठेवण्यात आल्या. अभंग, गाणी याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी भक्ती भावाने गाणी सादर केली.हरिपाठ झाला. लोकांनी पादुका दर्शन घेतल्यावर आरती झाली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका पुढच्या मुक्कामी ‘ रग्बी ‘ च्या दिशेने निघाल्या..
कार्यक्रमांमध्ये सुजाता फूड यांनी साबुदाणा खिचडी तसेच गजानन फूड यांनी शिरा तसेच भाविकांनी देखील फळे आणि प्रसाद आणला होता.
लॅमिंग्टन मराठी ग्रुपचे प्रवीण वाडेवालें , प्रसाद खोपडे , हृदयनाथ चौधरी , जितेंद्र बाविस्कर, अजित मुळे , प्रमोद दुसाने , अमृता बारवडे , अविनाश भोसले , दिगंबर काशीद , कुणाल जोशी व रामदास डोंगरे हे या ग्रुप लॅमिंटन मराठी ग्रुपचे प्रमुख सदस्य आहेत या मंडळींनी तसेच शहरातील मराठी मित्रमंडळीनी या कार्यक्रमाचे फार सुंदररीत्या आयोजन केले होते. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यंदा पंढरीच्या वारीत सहभाग नसल्याची रुखरुख थोडी फार कमी झाली.
रामकृष्ण हरी….
शरद कदम,
लॅमिंग्टन स्पा, वार्विक, इंग्लड.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️