


पिंपरी चिंचवड, ता. २१ – चिंचवडगाव येथील तालेरा महापालिका रुग्णालयात जळालेले व भाजलेले रुग्ण (Burn Patients) यांच्यासाठी प्रस्तावित असलेल्या बर्न वॉर्डच्या उभारणीसाठीची टेंडर प्रक्रिया सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक पद्धतीने व नियोजित रूपात ठराविक ठेकेदारांना फायदा होईल अशा प्रकारे राबवली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

सदर टेंडर फक्त ८ दिवसांसाठीच खुली ठेवण्यात आली आहे, आणि महापालिकेतील काही अधिकारी पूर्वनियोजित ठेकेदारांशी संगनमत करून आतून माहिती पुरवत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे इतर पात्र आणि दर्जेदार ठेकेदारांना सहभाग घेण्याची संधीच मिळत नाही, ही गंभीर बाब आहे.
याआधी याच पद्धतीने YCM रुग्णालयातील OT चे टेंडरही ठराविक ठेकेदारालाच मिळाल्याचे उदाहरण आहे. तालेरा हॉस्पिटलमधील बर्न वॉर्डचे टेंडरसुद्धा त्याच दिशेने जात आहे, हे नागरिकांच्या आणि जनप्रतिनिधींच्या लक्षात आले आहे.
बर्न वॉर्ड ही सामान्य इमारत नव्हे, तर ती रुग्णांच्या जीविताशी थेट संबंधित अत्यंत तांत्रिक सुविधा असते. अशा सुविधा केवळ अनुभवी व दर्जेदार ठेकेदारांकडूनच उभारल्या गेल्या पाहिजेत. मात्र, सद्यस्थितीत ही टेंडर प्रक्रिया केवळ नावापुरती स्पर्धा आणि प्रत्यक्षात पूर्वनियोजित वाटप अशा स्वरूपात चालत असल्याचे दिसून येते.
या अपारदर्शक प्रकाराला विरोध करत, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव श्री. सुनिल कांबळे यांनी आयुक्त मा. शेखर सिंह साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी:
संपूर्ण टेंडर प्रक्रियेची तात्काळ व स्वतंत्र चौकशी करण्याची,
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची,
आणि टेंडर प्रक्रिया पुन्हा पारदर्शक रितीने राबवण्याची स्पष्ट मागणी केली आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी संबंधित कामांमध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. जर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली नाही, तर आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करणार,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड सचिव – सामाजिक न्याय विभाग, सुनिल कांबळे यांनी दिला आहे.
तालेरा रुग्णालयाच्या टेंडर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️