


पिंपरी चिंचवड, ता. १३: – शहरातील अनेक मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून, अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्याच्या प्रारंभासोबतच डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यावर तात्काळ उपाययोजना राबवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. धम्मराज साळवे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवणे
नाले व गटारांमधील गाळ, प्लास्टिक व कचरा वेळेवर काढणे
पाणी साचणार नाही याची खबरदारी घेणे
गटारांची झाकणे व्यवस्थित आहेत का याची तपासणी
अपूर्ण रस्ते व स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करणे
झाडांच्या धोकादायक फांद्या वीज वाहिन्यांपासून दूर ठेवणे
सर्व प्रभागांमध्ये धूर (Fogging) व औषध फवारणी नियमित करणे
संभाव्य साथीच्या आजारांपासून प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम राबवणे
“शहरातील नागरिकांची सुरक्षितता व आरोग्य हेच आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे पालिकेने ही कामे तातडीने पूर्ण करावीत,” अशी आग्रही मागणी अॅड. साळवे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत कोणीही दुर्लक्ष करू नये. अन्यथा जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️