


पुणे, ता. २२: काश्मीर म्हणजे फक्त दहशतवाद हे समीकरण बदलण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले असून काश्मीरला वेगवेगळ्या नजरेने पाहणे बंद झाले तर काश्मीर परिसर अजून संपन्न होईल.’ असे प्रतिपादन लेप्टनंट जनरल ( निवृत्त) विनायक पाटणकर यांनी केले.

ब्रिगेडियर ( निवृत्त) प्रमथेश रैना यांनी लिहिलेल्या ‘ काश्मीर डॉन ऑफ न्यू एरा ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कर्नल विनोद मारवाह फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मेजर जनरल ( निवृत्त) जी. डी. बक्षी, अरुण वाखलू , कर्नल ( निवृत्त) विनोद मारवाह, इंडस बिझनेस स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जयसिंग मारवाह, सैन्य दलातील निवृत्त अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाटणकर पुढे म्हणाले की, काश्मिरी पंडितांची पुन्हा वापसी होणे हे महत्त्वाचे असून त्यामुळे काश्मीरची ओळख बदलू शकेल. सैन्य दल काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करत असते. सैन्याला अनेक अडथळे येत असतात परंतु त्यावर ते मात करत सौंदर्य अबाधित ठेवत आहेत.
मेजर जनरल बक्षी म्हणाले की, लष्करात मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वाचे असून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. परंतु तसे घडत नसून तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ याची एकत्रित सांगड घातली जात आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी लष्कर दिवसरात्र राबत असते.
रैना म्हणाले, ‘ काश्मीर प्रदेशावर चित्रपट आले, काश्मीर मधे कायदा बदल झाला. यामुळे काश्मीर बद्दल कुतूहल निर्माण झाले असले तरी राष्ट्र घडवण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. श्रीनगर सतत उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असते. त्यामुळे सातत्याने काश्मीर चर्चेत असते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️