


लेखक, श्री.दत्तात्रय पंडित

गेल्या काही दिवसापासुन पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल आणि दोन दिवसापासुन सोलापुरचे वळसंगकर हॉस्पिटल चर्चेत आहे. सर्वसामान्यांचे लक्ष या हॉस्पिटल मधील स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुश्रुत घैसास आणि मेंदुविकार तज्ञ डॉ.शिरिष वळसंगकर यांच्याकडे वेधलेले आहे.
पुण्यात डॉ.घैसासांवर गुन्हा दाखल झाला तर सोलापुरात डाॅ.वळसंगकरांनी स्वतला संपवले. तनिषा भिसेंच्या मृत्युने पुणे हळहळले तर वळसंगकरांच्या मृत्युने सोलापुर. थोडक्यात सांगायचं तर, वैद्यकिय क्षेत्रांतील सर्वानाच दोन्ही घटनांनी अस्वस्थ केले.
या दोन्ही घटना भिन्न असल्या तरी घटनेच्या मध्यभागी असलेले रुग्णालय आणि डाॅक्टर हे समान धागा आहेत. वैद्यकिय क्षेत्रात दोन्ही रुग्णालय नामांकित असली तरी रुग्णाप्रती असलेल्या जाणिवेबाबत आणि वैद्यकिय बांधिलकीबाबत मात्र दोन्ही रुग्णालयात प्रचंड तफावत आहे.
माझ्या नात्यातील रुग्ण दाखल असताना दोन्ही हाॅस्पिटलचा मी अनुभव घेतला आहे. दिनानाथ अलिकडच्या सात-आठ वर्षात प्रचंड व्यावसायिक झाले आहे. लतादिंदिच्या रुग्णसेवेच्या ध्येयातुन साकारलेल्या हेंतुना हरताळ फासण्याचे दिशेने चालले आहे. पैसा प्रथम आणि पैसा देणारा रुग्ण नंतर अशी वागणुक येथे येणार्या कित्येकांनी अनुभवली असेल. तर दिनानाथच्या अधिकार्यांनी नातेवाईकांना पैशासाठी वेठीस धरल्याचा कटु अनुभव काहींना नक्कीच आला असेल.
तनिषा भिसे मृत्युप्रकरणामुळे हे उद्योग चव्हाट्यावर आले. याउलट वळसंगकर हाॅस्पिटल रुग्ण प्रथम आणि पैसा नंतर या जाणिवेतुन चालवले जाते.आणि ते हाॅस्पिटलच्या आवारात दिसणार्या लोंकापासुन ते हाॅस्पिटल मधल्या सुविधा पासुन पदोपदी जाणवते.
रुग्णालयाचे दर पण तुलनेने कमी जाणवतात. आवारात दिसणारे बहुसंख्य नातेवाईक महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या खेड्या पाड्यातुन आलेली दिसतात. दिनानाथचे प्रशासकीय अधिकारी यांनी तनिषा भिसेंच्याच नातेवाईकांवर आरोप केले तर वळसंगकरच्या प्रशासकीय अधिकार्यांनी खुद्द डाॅ.वळसंगकरावरच आरोप केले.
एकीकडे डाॅ.घैसास (दिनानाथचे फक्त कन्सलंटट डाॅ असताना) रुग्णालयाच्या पेपरवर डिपाॅजिटसाठी शेरा मारताना आढळतात तर दुसरीकडे डाॅ.वळसंगकर प्रशासकीय अधिकारी रुग्णांकडुन जास्तीचे अतिरिक्त पैसे मागतात म्हणून प्रशासकीय अधिकार्यावर कारवाई करताना आढळतात.
डाॅ.घैसास असंवेदनशीलपणे रुग्णाबरोबरची वैद्यकिय बांधिलकी विसरल्याचे दिसतात तर दुसरीकडे डाॅ.वळसंगकर रुग्णांकडुन अतिरिक्त पैसे मागणार्या प्रशासकिय महिलेमुळे व्यथित झालेले दिसतात.डाॅ.घैसासांचे रुग्णहित विसरल्यामुळे वैद्यकीय भवितव्य पणाला लागले.तर डाॅ.वळसंगकरांनी रुग्णांच्या हितासाठी स्वतःचा प्राण पणाला लावला.
*डाॅ.शिरिष वळसंगकरा सारखा संवेदनशील देवमाणुस महाराष्ट्राने गमावला,महाराष्ट्रातील सर्व खाजगी रुग्णालयांनी वळसंगकर हाॅस्पिटलकडे बघुन रुग्ण संवेदना आणि रुग्णाप्रती वैद्यकिय बांधिलकी या दृष्टीने रुग्णालय प्रशासन चालवले तर ती डाॅ.शिरिष वळसंगकरांना खर्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️