


विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम

पिंपरी, ता. २५ : दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी पाच-सहा दिवस बाकी असताना आणि प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू असताना अचानक महानगरपालिकेच्या शाळांच्या वेळा बदलल्याने विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी मध्ये महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार तसेच राज्यपालांच्या सूचनेनुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याकारणाने लहान वर्ग सकाळी नऊ नंतर भरण्यात यावेत असा आदेश पारित झालेला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी दिलेल्या कडक सूचनांचे पालन करून पहिली ते चौथीचे वर्ग सकाळी नऊ नंतर भरवण्यासाठी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या.
परिणामी, सर्व खाजगी शाळा तसेच महानगरपालिकेच्या शाळा देखील जून महिन्यातपासून लहान वर्ग सकाळी नऊ नंतर भरवत होते. इयत्ता पाचवी पासूनचे वर्ग सकाळी सात ते साडेबारा आणि पहिली ते पाचवीचे वर्ग दुपारी साडेबारा ते साडेपाच या वेळात भरत होते.
परंतु शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांनी शुक्रवारी एक आदेश पारित करून या शाळा पूर्ववत वेळेप्रमाणे म्हणजे कन्या शाळा सकाळी सात ते साडेबारा आणि मुलांची शाळा साडेबारा ते साडेपाच या वेळात भरवण्यात यावी असा आदेश काढला आहे.
या आदेशानुसार आता पहिली ते चौथीच्या लहान मुलींना सुद्धा सकाळी सात वाजता शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. परिणामी विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी चार-पाच दिवस शिल्लक असताना आणि पहिल्या सत्राच्या परीक्षा सुरू असताना अचानक शाळांची वेळ का बदलली? असे प्रश्न पालक विचारत आहेत.
शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी वेळ बदलली असल्याची चर्चा
मुला- मुलींचे वर्ग एकाच वेळेत भरवल्याने गैरप्रकार होत असल्याचे कारण मुख्याध्यापकांनी दिले आहे. ज्यात काहीच तथ्य नाही प्रत्येक शाळेत पोलिसांचे दामिनी पथक कार्यरत आहे, दर आठवड्याला दोन पोलिस अधिकारी शाळेत भेट देतात. शाळेत दामिनी पथकाची तक्रार वही असून या वहीत एकही तक्रार दाखल नाही. शिवाय शाळेत असा एकही प्रकार घडला नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. केवळ शिक्षक संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी वेळ बदलली असल्याची चर्चा आहे.
लहान मुलींसाठी दुपारचीच वेळ ठीक आहे. त्यामुळे मुलींची पुरेशी झोप होते आहे. पालकांना विश्वासात न घेता वेळ बदलली आहे.
- कमल चव्हाण, पालक
सहा महिने तात्पुरत्या स्वरूपात बदल केले आहेत. अनेक जणांची मागणी असल्याने ४ ते ५ शाळांना मान्यता दिली आहे. एकाच कुटुंबातील पाल्य दुपार व सकाळ सत्रात असल्याने पालकांची तारांबळ उडत आहे.
- संगीता बांगर, शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
