


विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि मंत्री बावनकुळे यांच्यात सवलतीबाबत चर्चा

मुंबई /पिंपरी, दि.१० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत गृह प्रकल्प रद्द झाल्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी गृहप्रकल्प योजना अंतर्गत किवळे येथील प्रकल्पात घरे देण्यात येणार आहेत. सदर लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफ करणे व पीएमएवाय अनुदानाबाबत बैठकीचे आयोजन करून ७५५ लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क सवलत देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून किवळे गृहप्रकल्प लाभार्थ्यांना अनेक वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांना मुद्रांक शुल्क माफ करण्यात यावे आणि पंतप्रधान आवास योजनेतून अनुदान देण्यात यावे. याबाबत विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते व पदाधिकारी, लाभार्थ्यांसह भेट घेऊन यापूर्वी चर्चा केली होती. त्यावर आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या दालनात बैठक घेऊन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडे संबंधित पत्र देऊन सवलतीबाबत शिफारस केली आहे.
यानंतर कामगार नेते काशिनाथ नखाते आणि गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नखाते यांनी गृह प्रकल्पातील एकूण ७५५ लाभार्थ्यांच्या विविध अडचणी व मागण्या मंत्री महोदयांसमोर मांडून सविस्तर चर्चा केली. लाभार्थ्यांचे म्हणणे आणि त्यांच्या समस्या मंत्री बावनकुळे यांनी जाणून घेतल्या. तसेच गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांच्या हिताचा विचार करून शुल्क सवलतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, चेतन गायकवाड, सखाराम केदार, अनिल चौरे, अंगद मुंगळे, विष्णू माने, संजय शिंदे, संदीप कांबळे, गीता नागपुरे, शुभांगी चव्हाण, अश्विनी जायगुडे, धनश्री कोरे, पूजा निकम, आशा जाधव,प्रीती गोहाड आदी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
