


पिंपरी, दि. 5 ऑगस्ट – भ्रष्टाचाराने देश पोखरला असून,शासनातील अनेक विभागातील घोटाळे दरदिवशी उघडकीला येतात.महावितरणच्या शहरातील वीज जोडणी घोटाळा पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने उजागर केला होता.सुमारे पंचवीस ते तीस कोटींच्या या घोटाळ्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून,अधिकाऱ्यांना मुंबईतून अभय दिले जात असल्याचा खळबळजनक आरोप असोसिएशनने केला आहे.

पावसाच्या पहिल्या दणक्यानंतर अख्खे शहर अनेक दिवस अंधारात गेले होते आणि या सगळ्या अंधाराला महावितरणचा भ्रष्टाचार जबाबदार आहे.वीज जोडण्या देताना कुठलाही लोड न बघता,तांत्रिक निकष न तपासता पैसे खाऊन दिलेल्या जोडण्यांमुळे वीज यंत्रणा कोलमडलेली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये अधीक्षक अभियंता यांनी मनमर्जीपणे कारभार केला असून,त्याचा बुरखा असोसिएशनने एक घोटाळा बाहेर काढून फाडला होता.असे अनेक घोटाळे असून,शासनाने अशा अधिकाऱ्याची वेळीच उचलबांगडी करणे अपेक्षित होते.परंतु त्यांना अभय देण्यात जर वरिष्ठ अधिकारी धन्यता मानत असतील,तर शहराचे वीज पुरवठा सुरळीत रहावे हे दिवास्वप्नच राहणार आहे असे असोसिएशनने म्हटले आहे.
गेल्या दोन महिन्यात शहरातील झालेली विजेची समस्या काय एक दोन दिवसांत उद्भवलेली नाही,त्यामध्ये संघीय लुट अर्थात एकमेकांच्या गैरकारभारांना सांभाळून घेत,कारभार चालू ठेवणे हे देखील आले आहे.महावितरण मधील आऊटसोर्सिंग कर्मचारी ते वरिष्ठ सगळे अधिकारी यांच्याकडे करोडो रुपयांची माया असून,अनेक कर्मचाऱ्यांनी बेकायदा बांधकामे करत शासनाच्या नैतिकतेच्या धोरणाला हरताळ फासला आहे.
अधीक्षक अभियंता यांच्याविरोधात जर कारवाई न करण्याचे धोरण महावितरण ठेवणार असेल तर जसे दिल्लीत कोकरोच पार्टीने आंदोलन केले होते,तसे करणे भाग पडेल असा इशारा असोसिएशनने दिला आहे.बेकायदा बांधकामांना वीज जोडण्या देऊन महावितरणचे अधिकारी यांनी गुन्हा केला आहे,तसे एक प्रकरण आकुर्डी उपविभागात घडले आहे.त्यात अधिकारांचा गैरवापर करून,संबंधित महिला अभियंत्याने पैसे खाऊन जोडण्या दिल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते.त्यालाही अभय दिले जात असून, महावितरण लुटून खाणाऱ्या अशांना जनतेने जाब विचारण्याची वेळ आलेली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
