


पिंपरी दि.१४ – पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे येथे थर्मल कंपनीच्या सीमा भिंतीचे बांधकाम करत असताना निष्पाप कामगार व त्यांची पत्नी यांचा मृत्यू झाला या कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून वारसांना २० लाखाचे अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कामगार मंत्री पोलीस आयुक्त महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केले आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठे औद्योगिक क्षेत्र आहे आणि यामध्ये कामगारांची संख्या लाखोंनी आहे, मात्र दररोज कामगार सुरक्षेच्या कारणास्तव मृत्युमुखी पडत आहेत. यामध्ये पूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये तळवडे येथे कंपनीच्या खुल्या जागेमध्ये सीमा भिंत बांधण्याचे काम सुरू असताना सदरची भिंत कोसळून मजूर दांपत्य सचिन शंकर राठोड व कोमल सचिन राठोड यांचा मृत्यू झाला तर मनोहर भिकू चव्हाण हे जखमी झालेले आहेत.
जोतिबा नगर परिसरामध्ये थर्मल कंपनीच्या जागेत सीमा भिंतीचे काम सुरू होते. यावेळी सुरक्षा साधने याचा वापर करण्यात आला नाही तसेच कामगारांना सुरक्षिततेबाबत जागृत केले गेले नसल्यानेच हा मृत्यू झाला आहे याला जबाबदार असणारे सदाशिव आगळे व दीपक जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सदर मृतांच्या वारसांना २० लाख रुपये अर्थसहाय देण्यात यावे, अशी मागणी काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने लाला राठोड, विनोद गवई यांनी केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
