


“जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार, माझ्यासह भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी केल्याबद्दल नागरिकांचे आभार” – राहुल कलाटे

वाकड, ता.१६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून राहुल तानाजी कलाटे यांच्यासह भाजप उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असून, प्रभाग क्रमांक २५ मध्ये पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) अशी बहुरंगी लढत असताना देखील याठिकाणी, राहुल कलाटे यांनी आपला गढ राखला असून, कलाटे यांच्यासह भाजप आणि आरपीआय महायुतीचे कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर विजयी झाले आहेत. याठिकाणी भाजपचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहे.
विजयानंतर राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. कलाटे यांनी सांगितले की, “या विजयामागे जनतेचा विकासासाठीचा विश्वास आणि सक्षम नेतृत्वाची भूमिका निर्णायक ठरली.”
राहुल कलाटे यांनी मार्मिकपणे सांगितले:
“प्रभाग २५ मधील जनतेने ठरवले होते की त्यांच्या विकासाच्या अपेक्षांना उत्तर देणाऱ्या नेतृत्वालाच साथ देणार. जनतेने दिलेला शब्द पूर्ण केला आता आम्ही दिलेले सर्व शब्द पूर्ण करणार आहोत. विकासाच्या वाटेवर एकत्र चालताना, जनतेचा विश्वास आणि नेतृत्वाची साथ हाच आपला खरा विजय आहे.”
या विजयासह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर आला असून, स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे विकासाच्या अजेंड्याला अधिक वेग मिळेल, असे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात येत आहे.
राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशाला आधी स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. परंतु कलाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रभागातील पॅनलचा विजय सुकर झाल्याचे उमेदवार देखील मान्य करत आहेत. स्थानिक पातळीवर राम वाकडकर यांनी यापूर्वी कलाटे यांना विरोध केला होता, परंतु आता त्यांच्या पत्नी श्रुती वाकडकर देखील निवडून आल्या आहेत.
याठिकाणी एकप्रकारे स्थानिक भाजप नेतृत्वाने प्रभागातील निवडणूक कलाटेंवर सोपवली असल्याचे चित्र होते.
कारण एखादा मोठा नेता किंवा आमदार या प्रभागात फिरकले नाहीत. तरी देखील राहुल कालटे यांनी जिथे आजवर कमळ फुलले नव्हते त्या प्रभागात पक्षाला विजय मिळवून दाखवला असून, यासाठी स्थानिक पातळीवर नवनाथ ढवळे, भारती विनोदे, चेतन भुजबळ, संतोष पवार यांची साथ लाभली.
मागील निवडणुकीप्रमाणे आयटीयन्स राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये कलाटेंची क्रेझ दिसून आली असून, याठिकाणी भाजपला मोठ्या संख्येने बहुमत मिळालेले दिसून येत आहे.
“सर्व मतदार-बंधू भगिनी व मायबाप जनता आपण सर्वांनी, माझ्या प्रत्येक संघर्षात कायम माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहून, आशीर्वादरुपी सावली माझ्यावर धरली. आपण सर्वांनी आजही तेच प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत ठेवत, प्रभाग क्र. २५ (ड) मधील हा विजय मिळवून दिला.
त्यामुळे हा विजय माझा एकट्याचा नसून, आपल्या सर्वांच्या प्रेमाचा आहे. यासाठी मी कायम आपला ऋणी असून, आपल्या सर्वांच्या स्वप्नातील प्रभाग घडविण्याचे वचन देतो. संपूर्ण पॅनल विजयी केल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी पक्ष नेतृत्वाचे देखील मनःपूर्वक आभार मानतो.”
राहुल कलाटे

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
