


- माजी नगरसेविका सुरेखा लोंढे यांचा उमेदवारांना जाहीर पाठिंबा
पिंपरी | प्रतिनिधी, ता. १२: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 (सँन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड होताना दिसत आहे. या प्रभागातील माजी नगरसेविका सुरेखा लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या मुळे या प्रभागातील निवडणूक समीकरणे राष्ट्रवादीच्या बाजूने झुकली असल्याचे चित्र आहे.

सुरेखा लोंढे या सन 2002 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी ठरल्या होत्या. त्या वेळी त्या माजी आमदार विलास लांडे यांच्या पॅनेल मधून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत पाठिंबा दर्शविला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभागातील राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे.
या वेळी प्रभाग क्रमांक 7 मधून अ प्रवर्गातून विराज विश्वनाथ लांडे, ब प्रवर्गातून अनुराधा सुशिल लांडगे, क प्रवर्गातून अश्विनी निलेश फुगे आणि ड प्रवर्गातून अमोल मधुकर डोळस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना लोंढे यांनी पाठिंबा दिला आहे.
लोंढे परिवाराचा प्रभागात चांगला जनसंपर्क असून त्यांच्या समर्थकांची मोठी फळी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती अधिक भक्कम झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
