


गुलाल आजच खेळायला हरकत नाही; आमदार रोहित पवार

राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र.१६ पॅनेलच्या रॅलीला रोहित पवारांची दमदार एंट्री
पिंपरी, दि. ११: पिंपरी चिंचवड शहराची विकासकामे ही अजित पवारांनी केली आहेत. तसेच, शरद पवार साहेब केंद्रात होते त्यावेळी या शहराला भरघोस निधी मिळाला आहे. तेव्हा कुठे पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. परंतु, येत्या काही वर्षात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. ते चित्र बदलण्यासाठीच रॅलीला इतका मोठा प्रतिसाद मिळाला आहे की, आजच गुलाल खेळायला हरकत नसल्याचे आमदार रोहीत पवार म्हणाले.
ते राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र.१६ पॅनेलच्या रॅलीवेळी बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग १६ चे पॅनल प्रमुख आणि सर्वसाधारण गट ड चे उमेदवार माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गटाच्या उमेदवार जयश्री भोंडवे, सार्वसाधरण महिला क गटाच्या आशा भोंडवे, अनुसूचित जाती अ गटाच्या श्रेया तरस–गायकवाड यांचे रॅली दरम्यान नागरिकांनी स्वागत केले.
रोहित पवार पुढे म्हणाले, ’वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न शहरात निर्माण झालेला आहे. पिण्याच्या पाण्याचा टंचाई भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांनीच ही निवडणूक हाती घेतली आहे. मला वाटल ही रॅली शेकडो कार्यकर्त्यांची असेल पण, यामध्ये हजारो कार्यकर्ते प्रेमापोटी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्याबाहेर जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे युवकांना नोकऱ्या नाहीत. नवीन आयटी तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही रॅलीमध्ये आयटी मधील युवकांचा पाठिंबा त्याच कारणामुळे मोठा लाभला आहे. त्यामुळे आयटी युवक राष्ट्रवादी पक्षाला प्रोत्साहन देत आहेत.
भ्रष्टाचारा विरोधात सडेतोड उत्तर..
पिंपरी चिंचवड शहरात आजही रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूची कामे वाटून घेतली जाऊन मोठा गफला केला जात आहेत. कुत्र्यांच्या नसबंदीत देखील पैसा खाल्ला जात आहे. तसेच, निष्ठावंत कार्यकर्त्याना डावलून आयात उमेदवारांना भाजपाने तिकीट दिले. त्यामुळे पक्षात एकूणच नाराजगी आहे. चिंचवडच्या विकासासोबत भोसरीचा विकास देखील करायचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा हवी.
आमच्यावर मनापासून प्रेम असणारे नागरिक आज रॅलीत हजारोंच्या संख्येने जमा झाले. रोहित दादा आणि अजित दादा यांना आम्ही कधी वेगळे समजलेच नाही. मतदार माझे आई वडीलच आहेत. ग्रामीण भागातीलच मुल आयटीयन्स झाली आहेत. त्याना त्यांचा मूळ पक्ष माहीत आहे. त्यामुळे आज ते आपल्या रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
