


- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश
- प्रधानमंत्री आवास योजना, सोमवारी होणार सोडत
पिंपरी–चिंचवड । प्रतिनिधी, ता.12: पिंपरी-चिंचवडमधील डुडूळगाव व किवळे येथील घरकुल प्रकल्पांच्या संगणकीय सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर त्यांच्या मागणीला यश मिळत असून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या दोन्ही प्रकल्पांची सोडत सोमवारी, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, पिंपळेगुरव येथे पार पडणार आहे.

महापालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने डुडूळगाव येथे १ हजार १९० तर किवळे येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ७५५ सदनिकांची उभारणी केली आहे. या प्रकल्पांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील पात्र अर्जांची छाननी पूर्ण झाली असून आता संगणकीय सोडत प्रक्रियेचे औपचारिक आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकृत फेसबुक व युट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली.
आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, बैठका आणि शासन-प्रशासनाशी झालेल्या चर्चेमुळे अखेर हा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून हजारो कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड शहरात होत असून, आतापर्यंत सुमारे 19 हजाराहून अधिक सदनिकांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आगामी काळात शहर झोपडपट्टी मुक्त आणि प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, असा संकल्प करण्यात आला आहे.
“डुडूळगाव आणि किवळे येथील घरकुल प्रकल्पांची सोडत लवकरात लवकर व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ही मागणी मान्य होऊन 2 हजार कुटुंबांच्या डोक्यावर स्वतःच्या घराचे छत उभे राहणार आहे, ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या उपक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्यासह महापालिका प्रशासन व शासनाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
