


-११ व्या ‘कौशल्यम लाईटहाऊस सेंटर’चे किवळेमध्ये उद्घाटन

-‘कौशल्यम लाईट हाऊस’ सेंटरच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगार संधी उपलब्ध होणार
पिंपरी, 6 डिसेंबर: किवळे येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून ‘कौशल्यम लाईट हाऊस’ सेंटर सुरू करून युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे . या माध्यमातून युवकांसाठी कौशल्य व रोजगाराचे व्यासपीठ अधिक मजबूत झाले असल्याचे आमदार शंकर जगताप म्हणाले. ‘कौशल्यम लाईट हाऊस’ सेंटरच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ११ वे ‘कौशल्यम लाईटहाऊस’ सेंटर किवळे येथे नागरिकांच्या सेवेत रुजू झाले. या महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी केंद्राचे उद्घाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, ‘कौशल्यम लाईटहाऊस’ उपक्रमाचा उद्देश १८ ते ३० वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील युवकांना मोफत प्रशिक्षण, रोजगारक्षम कौशल्ये आणि विश्वसनीय रोजगारसंधी उपलब्ध करून देणे हा आहे.
विशेषतः वंचित घटकातील युवक व महिलांना शाश्वत उपजीविकेचा मार्ग मिळावा यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. प्रशिक्षणानंतर नोकरी किंवा उद्योग मिळेपर्यंत महापालिकेकडून दिले जाणारे सर्वांगीण मार्गदर्शन उल्लेखनीय आहे.
आमदार जगताप पुढे म्हणाले, आजतागायत पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरीसह आता किवळे येथे मिळून एकूण ११ लाईटहाऊस केंद्र कार्यरत झाले आहेत, ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब आहे. युवकांना करिअरमध्ये नवी दिशा देणाऱ्या ‘घरकामगार ते गृहव्यवस्थापक”’ या मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचाही आज शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके आमदार जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, बोऱ्हाडेवाडी, नेहरूनगर, दापोडी, बोपखेल, चिखली आणि किवळे अशा एकूण ११ लाईटहाउस केंद्रांची कार्यरत आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप या सूत्राने महानगरपालिका, लाईट हाऊस आणि विविध सीएसआर पार्टनर यांच्या एकत्र प्रयत्नाने हा उपक्रम राबविला जात आहे.
आज आपण ११ वे लाईटहाउस सेन्टरचे उद्घाटन केले आहे. हे लाइटहाऊस, के-टाउन सोसायटीजवळ, विकासनगर, किवळे येथे सुरू करण्यात आले आहे. ऑफिस एक्झिक्युटिव्ह, टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग, सीएनसी प्रोग्रॅमिंग, ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट, फिटनेस आणि न्यूट्रिशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व प्रोग्रॅमिंग, डिजिटल मार्केटिंग, लॉजिस्टिक असे विविध प्रकारचे प्रशिक्षण तरुणांना दिले जाते .
शहरातील युवा पिढीने , ‘कौशल्यम लाईटहाऊस’ उपक्रमाचा पुरेपूर लाभ घेत स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा, जिद्द, चिकाटी आणि सातत्य दाखवत नोकरी, रोजगार आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांत आपली नवी ओळख निर्माण करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना भारताची खरी संपत्ती घोषित केले आहे, या विचाराला बळ देत तरुणांनी कौशल्य संपादित करून स्वत:च्या देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
शंकर जगताप
आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
