


पिंपरी, दि. २ डिसेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे अशा विविध शैक्षणिक संस्थांसाठी अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांनी अग्निशमन विभागामध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अधिकृत अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

कोणतीही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लास, अकादमी किंवा प्रशिक्षण केंद्र हे अग्निसुरक्षेच्या नियमांपासून मुक्त नाही. अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, फायर अलार्म प्रणाली तसेच प्रशिक्षित कर्मचारी यांची उपलब्धता ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर महापालिकेमार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा उपाय असणे गरजेचे असून, सर्व संस्थांनी निर्धारित नियमांचे पालन करावे. आपला व्यावसायिक वापर असलेला परिसर अग्नी सुरक्षित करणे व ठेवणे ही संबंधित संस्था चालक-मालक यांची जबाबदारी असून, सदर शैक्षणिक संस्थेची क्लासेसची नोंदणी व आवश्यक अग्नी सुरक्षितता उपाय योजना केल्यास गंभीर दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होईल, असेही अग्निशमन विभागातून स्पष्ट करण्यात आले आहे.
……
ऑनलाइन नोंदणीची सुविधा
पिंपरी चिंचवड महापालिकेने अग्निसुरक्षा तपासणी व नोंदणीसाठी व प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा https://noncoreerp.pcmcindia.gov.in/login या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शहरातील अग्निशमन विभागामार्फत यासंबंधी ” क्यूआर कोड” प्रसिद्ध करण्यात आला असून, तो स्कॅन करून आवश्यक कागदपत्रे सादर करून नोंदणी आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.
….
शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज अनेक विद्यार्थी उपस्थित असतात, आणि त्यांच्या सुरक्षेची हमी देणे ही शैक्षणिक संस्था चालकाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळेच नोंदणी आणि अधिकृत अग्निसुरक्षा प्रमाणपत्र प्रत्येक शैक्षणिक संस्थेने घेणे अनिवार्य आहे.
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…….
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी तातडीने अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून ती कायमस्वरूपी सक्षम आणि सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करून नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी लागेल. कारण कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हे आमचे सर्वोच्च ध्येय आहे.
— व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……
क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ही संस्थांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. संस्थांनी याचा वापर करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि अग्निसुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवावी. वेळेवर घेतलेली ही खबरदारी गंभीर दुर्घटना टाळण्यास नक्कीच मोठी भूमिका बजावू शकते.
— ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
……

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
