


पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनची मागणी.

पिंपरी चिंचवड, ता. २६ – पिंपरी चिंचवडचा विस्तार आणि आसपासच्या क्षेत्राची होत असलेली प्रगती लक्षात घेता महावितरणने ग्राहकांच्या सुविधेसाठी पिंपरी चिंचवड मंडल कार्यालयाची नव्याने स्थापना करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन असोसिएशनने महावितरणचे मानव संसाधन विभागाचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांची मुंबईत भेट घेऊन दिले.
शहरात पिंपरी आणि भोसरी ही दोन विभागीय कार्यालये असून त्यांना गणेशखिंड मंडल कार्यालय पुणे इथे संलग्न करण्यात आलेले आहे. दोन्ही विभागीय कार्यालये मिळून दहा लाखांहून अधिक वीज ग्राहकांना सेवा देत आहेत आणि दिवसेंदिवस ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याशिवाय आसपासच्या चाकण, आळंदी, तळेगाव, वडगाव, लोणावळा या भागासाठी राजगुरुनगर विभागीय कार्यालय असून,ते पुणे ग्रामीण मंडल कार्यालय, रस्तापेठशी संलग्न आहे.
या भागातील वीज ग्राहकांना सध्या असलेले मंडल कार्यालय भौगोलिक दृष्ट्या अंतराने लांब पडत असल्याने वीज ग्राहकांची मोठी गोची होत असते.याव्यतिरिक्त मंचर, नारायणगाव, आंबेगाव आदी सगळा भागही पुणे ग्रामीण मंडल कार्यालयाशी संलग्न असल्याने त्या भागातील ग्राहकही लांब पल्ल्याच्या अंतराने त्रस्त आहेत.
त्यामुळे भोसरी,पिंपरी,राजगुरुनगर आणि मंचर विभाग मिळून पिंपरी चिंचवड शहरात मंडल कार्यालयाची नव्याने स्थापना झाल्यास ग्राहकांना निम्मे अंतर कमी होऊन चांगली सेवा मिळायला मदत मिळू शकते.
याशिवाय पिंपरी चिंचवड भौगोलिक दृष्ट्या देखील या सगळ्या विभागातील ग्राहकांना मध्यभागी पडत असल्याने महावितरणने मंडल कार्यालय स्थापन करून शहराला आणि ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी संघटना अध्यक्ष ॲड गिरीश बक्षी आणि उपाध्यक्ष मनोज हरपळे यांनी केली आहे.
मंडल कार्यालय स्थापनेचे सगळे निकष पूर्ण होत असून,शहराच्या विकासासाठी आणि सुविधांसाठी मंडल कार्यालय स्थापना तत्काळ केली जाण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र पवार यांनी याबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिल्याचे संघटनेने म्हटले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
