


३५ मालमत्ता जप्त व १०५ नळ कनेक्शन करण्यात आले खंडित

पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून, थकबाकीदारांवर जप्तीची कठोर कारवाई सुरू आहे. १ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत शहरातील ३५ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच १०५ नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, विविध ठिकाणी थेट मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत कारवाई सुरू आहे.
महापालिकेकडून वारंवार आवाहन करून, तसेच नोटीस देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उपायुक्त पंकज पाटील यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिले आहेत. ही मोहीम पुढील महिनाभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, या काळात मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागातून देण्यात आली.
या कारवाईसाठी १८ विभागीय कार्यालयांतील सर्व गटप्रमुखांना जबाबदारी देण्यात आली असून, शहरातील निवासी तसेच बिगरनिवासी थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. विभागीय कार्यालयांतील पथकांनी थकबाकीदारांच्या मालमत्तांना भेट देऊन जप्ती प्रक्रिया सुरू केली आहे. दिवसभरात १८ विभागीय कार्यालयांतर्गत १८ पथके वसुली मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत ३५ मालमत्ता सील करण्यात आल्या असून, १०५ मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शनदेखील खंडित करण्यात आले आहेत.
……
पिंपरी चिंचवड महापालिकेने कर वसुलीबाबत आता कठोर भूमिका घेतली आहे. थकबाकीदारांना वारंवार सूचना देऊनही कर न भरल्यास महापालिकेस नियमानुसार जप्तीची कारवाई करणे भाग पडते. विभागीय कार्यालयांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून, थकबाकीदारांनी तात्काळ मालमत्ता कराची थकीत रक्कम भरून जप्तीची कारवाई टाळावी.
— पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
….

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
