


चांगलं पेरलं तरच चांगलं उगवेल!

पिंपरी-चिंचवड : १९८६-८७ साली स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून ज्ञानेश्वर लांडगे निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, तर उपमहापौर आणि विविध समित्यांचे प्रमुख हे सर्व काँग्रेस पक्षाचे होते. १९९२ आणि १९९७ साली पुन्हा काँग्रेसचेच महापौर झाले, तर २००२ मध्येही उपमहापौरपद काँग्रेसकडेच होतं. त्या काळात काँग्रेसचे मजबूत वर्चस्व शहरात टिकून होतं.
मात्र, गेल्या २० वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली. स्थानिक नेतृत्वानेच पक्षाला वेठीस धरलं आणि तळागाळापर्यंत पोहोचलेला काँग्रेस पक्ष “स्लो पॉयझन”ने संपवण्यात काहींना यश मिळालं. जे नेते काँग्रेसच्या विचारधारेवर मोठे झाले, त्यांनीच कालांतराने पक्षाला पाठीमागून घाव घातला. तरीही, पिंपरी-चिंचवडमधील मतदार आजही काँग्रेस विचारसरणीशी निष्ठावंत राहिले आहेत.
१९९५ च्या निवडणुकीत स्व. रामकृष्ण मोरे यांच्या पराभवानंतर काँग्रेसला मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर शहरात गळती सुरू झाली. मात्र, स्व. मोतीराम पवार, स्व. अशोक तापकीर आणि ज्ञानेश्वर लांडगे या आमदारांनी सातत्याने कार्यकर्त्यांशी संवाद ठेवत, युवक-युवतींना प्रेरित करत पक्षाचे वर्चस्व टिकवून ठेवले.
पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेस कमिटीमध्ये पूर्वी पदाधिकाऱ्यांची निवड काम आणि प्रामाणिकतेच्या आधारावर होत असे. २००२ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल ३२-३३ नगरसेवक निवडून आले होते. २००७ मध्ये २२, २०१२ मध्ये १०-१२ नगरसेवकांपर्यंत आकडा घसरला आणि २०१७ पासून काँग्रेसचे प्रतिनिधित्व जवळपास संपुष्टात आलं. याला स्थानिक नेतृत्वाचे अपयशच कारणीभूत ठरल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, कोकण, नगर, धुळे, जळगाव, नाशिक या भागांतील लोक स्थायिक झाले होते. या सर्वच समाजघटकांचा काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास होता. अॅम्युनेशन फॅक्टरी, टेल्को, बजाज ऑटो, बजाज टेम्पो, किर्लोस्कर, महिंद्रा, एचए (HA) कंपनी यांसारख्या उद्योगांमध्ये काम करणारा हा वर्ग काँग्रेसचा मजबूत पाया ठरला होता.
काँग्रेसने विकासाची दिशा दिल्याने शहरात झपाट्याने नागरी सुविधा निर्माण झाल्या आणि जनतेशी असलेला आपुलकीचा संवादच पक्षाची खरी ताकद ठरली.
आज पुन्हा तोच विश्वास, तीच निष्ठा आणि तळागाळातील संवाद परत मिळवण्याची गरज आहे. कारण —
“चांगलं पेरलं तरच चांगलं उगवेल!”
✍️ – संदेश दत्तात्रेय नवले, सरचिटणीस, ग्रामीण ब्लॉक काँग्रेस, पिंपरी-चिंचवड

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
