


शहराचा देशात सातवा, राज्यात पहिला क्रमांक…

पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराचा देशात ७ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर ७ स्टार गार्बेज फ्री सिटी व वॉटर प्लस असे पुन्हा एकदा मानांकन मिळविले आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये शहराचा देशात १० वा तर राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी शहराचा राज्यात पहिल्यांदाच प्रथम क्रमांक आला आहे.
दिल्ली येथे आज झालेल्या पुरस्कार वितरण साेहळ्यात केंद्रीय नगरविकास, शहरी मंत्री मनाेहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आराेग्य विभागाचे उपआयुक्त सचिन पवार यांनी पुररस्कार स्विकारला.
यावेळी सचिव श्रीनिवास कटिथिली, सेक्रेटरी रुपा मिश्रा, महापालिकेचे कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, आराेग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह आदी अधिकारी उपस्थित हाेते.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत दरवर्षी शहरांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नागरिक सहभाग, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, शौचालये व मलनिस्सारण व्यवस्थेचे मूल्यांकन केले जाते. २०२४ च्या या स्पर्धेमध्ये देशातील चार हजार ५८९ शहरांनी भाग घेतला, त्यात पिंपरी-चिंचवड शहराने सातव्या क्रमांक मिळविला आहे.
कचरा मुक्त शहर महापालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे योग्य प्रकारे संकलन, वर्गीकरण, पुनर्वापर आणि विल्हेवाट लावण्याचे कार्य नियमितपणे केले जात आहे. प्रत्येक प्रभागात घराघरातून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. स्रोताजवळ प्रक्रिया युनिट्स, कंपोस्टिंग, रीसायकलिंग प्लांट, बायोगॅस यंत्रणा आदींचा वापर केला जात आहे. यामुळे शहराने ७ स्टार कचरा मुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त केले आहे.
शहरात मलनिस्सारणाची कार्यक्षम व्यवस्था, सीवेज ट्रिटमेंट प्लांट, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि पुर्नवापर यामध्ये चांगले काम केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण यशस्वी होण्यासाठी केवळ महापालिकेचे नव्हे, तर शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा व उद्योगांचे मोठे योगदान लाभले. नागरिकांनी नियमित कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये सक्रीय सहभाग घेतल्याची माहिती आराेग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा वाढता आलेख
वर्ष क्रमांक
2016 – 9
2017 – 72
2018 – 43
2019 – 52
2020 – 24
2021 – 19
2022 – 19
2023 – 10
2024 – 7
शहरातील स्वच्छतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे, सफाई कर्मचारी, अधिकारी वर्ग, आणि स्वयंसेवी संस्थांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान आपणा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. येत्या काळात आपली जबाबदारी आणखी वाढली असून,त्यादृष्टीने आणखी अनेक शाश्वत उपक्रम राबविले जातील.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका.
महापलिकेला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद असून, आता पुढील उद्दिष्ट म्हणजे शाश्वत स्वच्छता, घनकचरा शून्य धोरण, जलपुनर्वापर आणि पर्यावरणपूरक शहर यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्कार कौतुकास्पद आहे. शहर स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी वेळाेवेळी मार्गदर्शन केले. आराेग्य विभागातील सर्व कर्मचारी, शहरातील प्रत्येक नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळेच आज देशात ७ वा तर राज्यात पहिला क्रमांक आला आहे. यापुढील काळात आणखी जोमाने शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करू. पुढील वर्षी देशात प्रथम क्रमांक यावा, यासाठी आतापासूनच विशेष खबरदारी घेतली जाईल. - सचिन पवार, उपआयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️