


पुणे जिल्हास्तरीय मीडिया संमेलन :

पिंपरी, पुणे | प्रतिनिधी ता. १७: पुणे जिल्हास्तरीय ‘सायबर युगातील पत्रकारिता : मूल्य, आव्हाने आणि संधी’ या विषयावर विशेष मीडिया सेमिनारचे आयोजन शुक्रवार, दिनांक 18 जुलै 2025 रोजी करण्यात आले आहे. हे संमेलन दुपारी 3 ते 5 या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे होणार आहे.
या संमेलनामध्ये पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्राशी संबंधित अनेक मान्यवर तज्ज्ञ, अभ्यासक, आणि कार्यकर्ते सहभागी होणार असून, प्रिंट मीडिया, वृत्तपत्रे, टेलिव्हिजन, रेडिओ, केबल नेटवर्क, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाईल जर्नालिझम, सोशल मीडिया तसेच जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे. पत्रकारिता आणि मीडिया शिक्षण संस्था यांचाही उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
सायबर युगात पत्रकारिता क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या नैतिक मूल्यांच्या जपणुकीसह नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या संधी आणि आव्हानांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे. माहितीचा वेग, सत्यता, फेक न्यूज, माध्यम स्वातंत्र्य, डिजिटल माध्यमांचा प्रसार आणि जबाबदारी या मुद्द्यांवर सखोल चर्चा होणार आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना परस्पर संवादाचे, विचारांची देवाणघेवाण करण्याचे आणि नवे दृष्टिकोन उभारण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. संमेलनात ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू, डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांचे मार्गदर्शन लाभागणार असून संमेलनात पुणे येथील माध्यमक्षेत्रातील तज्ज्ञांचेही मार्गदर्शन होणार आहे.
मीडिया सेमिनारसाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाही त्याअनुषंगाने सर्व मीडिया तज्ज्ञांना आणि पत्रकारांना या महत्त्वपूर्ण विचारमंथनात सहभागी होण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी सुरेखा दीदी, संचालिका, ब्रह्माकुमारीज पिंपरी सेवाकेंद्र, पुणे आणि सोमनाथ म्हस्के, पुणे जिल्हा समन्वयक, मीडिया प्रभाग यांनी केले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️