


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार..

पिंपरी, दि. १५ जुलै २०२५ : आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अतिक्रमण कारवाईत थेरगाव व रहाटणी येथील महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या मजल्यांचे तसेच पत्रा शेडचे १३,३१५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८ अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
थेरगाव येथील कारवाईमध्ये ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच कारवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निष्कासन कारवाईमध्ये पोकलेन व जेसीबी यांचा वापर करण्यात आला. शिवाय यावेळी अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका याठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.तर महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई मध्ये थेरगाव येथील गुजरनगर, लक्ष्मणनगर तसेच रहाटणी गावठाण येथील अनधिकृत बांधकामांचा समावेश होता. येथील इमारती मध्ये अनधिकृत पद्धतीने उभारलेले इमारतींचे मजले तसेच पत्र्यांच्या बांधकामांवर महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
——-
शहरातील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकास सोबतच येथील नागरिकांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. शहरात अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️