


पिंपरी-चिंचवड शहरात जैवविविधतेसाठी धोका निर्माण करणारी परिस्थिती

पिंपरी चिंचवड, ता. १२: पिंपरी-चिंचवड शहरात सध्या सुरू असलेला नदी सुधार प्रकल्प म्हणजेच रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, हा केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न राहता शहरातील नैसर्गिक परिसंस्थांवर गंभीर परिणाम घडवणारा ठरत आहे. विशेषतः पवना आणि इंद्रायणी नदीच्या काठावरील जैवविविधता यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
नदीकिनारी असणारे अनेक प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव आणि जलचर यांचा अधिवास हा नैसर्गिक स्वरूपाचा असतो. नदीच्या काठावरची माती, झाडे, खोल्या आणि गाळ हे सगळे घटक त्या जैवविविधतेच्या टिकण्यासाठी आवश्यक असतात. मात्र, सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीकिनारे काँक्रिटने झाकले जात आहेत, बंधारे बांधले जात आहेत, आणि खोल भाग बुजवले जात आहेत. त्यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून प्राणी आता राहण्यासाठी जागा शोधत घरांमध्ये, इमारतींच्या छप्परांवर किंवा रहिवासी परिसरात घुसू लागले आहेत.
अशाच एका घटनेत, पवना नदी काठी एक घरात एक घोरपड (Monitor Lizard) आढळून आली. घोरपड ही संरक्षण मिळालेली प्रजाती असून जैव साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. सुदैवाने, वर्ल्ड फॉर नेचर च्या प्रयत्नाने तिला पुन्हा नदीकिनाऱ्यावर मुक्त करण्यात आले. पण हा प्रसंग ही एक चेतावणी आहे की आपल्याकडून काहीतरी चूक घडते आहे.
रिव्हर डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे स्वरूप अधिक पर्यावरणपूरक असणे आवश्यक आहे. सध्या सुरू असलेला प्रकल्प हा प्राण्यांच्या सुरक्षित अधिवासावर गदा आणत आहे, आणि भविष्यात ते संपूर्ण नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी, पर्यावरणतज्ज्ञांनी, स्थानिक संस्था आणि शासनाने एकत्र येऊन यावर विचार करण्याची गरज आहे. नदीकाठीची जैवविविधता ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य भेट आहे. ती नष्ट होण्याआधीच नदी सुधार प्रकल्पाला थांबवून, पर्यावरण संतुलन टिकवणारा प्रकल्प राबवला जावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
नदी वाचवा, जैवविविधता वाचवा — हे आता नारे उरले नसून, कृतीची गरज आहे.
शुभम पांडे – संस्थापकीय अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️