


पुणे, दि. 3: जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समिती बैठकीत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत निर्देश देण्यात आले असून त्याचे स्कूल बस चालक, मालक, स्कूल बस संघटना, शाळा, नागरिक आदींनी पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव यांनी केले आहे.

समितीचे अध्यक्ष तथा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात 11 जून रोजी बैठक आयोजित करण्यात आली. त्या अनुषंगाने यावेळी शाळेत मुलांची ने-आण करणाऱ्या बसेस व इतर वाहनांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांच्या पालनाबाबत निर्देश देण्यात आले.
ही वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील यादृष्टीने खबरदारी संबधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी. प्रत्येक बस व इतर वाहनात 31 जुलै 2025 पर्यंत सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्याची नेमणूक करावी तसेच मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला कर्मचारी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहनचालक, वाहक, क्लीनर यांची पोलीस पडताळणी केल्याची खात्री तसेच बसच्या वाहन चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी झाली झाल्याचे प्रमाणपत्राची शालेय परिवहन समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीने करावी. नेत्र तपासणी प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनचालकांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे निर्देश जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीने दिल्याचे श्री. जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️