


पिंपरी चिंचवड, दि. २: निगडी सेक्टर नंबर २२ येथील शरदचंद्र हाऊसिंग सोसायटी (बिल्डिंग क्रमांक बी-१२) परिसरातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, या ठिकाणी पावसाचे पाणी साचते, रस्त्याची लेव्हल चुकीची आहे आणि डांबरीकरण पूर्णतः उखडलेले आहे. परिणामी अनेक गाड्या घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत.

या समस्येची माहिती श्री. योगेश बनसोडे आणि श्री. रोहित सूर्यवंशी यांनी दिल्यानंतर, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री. सुनिल कांबळे यांनी महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.
श्री. कांबळे यांनी सांगितले की, “रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असून नागरिक, विशेषतः महिला, लहान मुले व वृद्ध यांना रोजच्या जीवनात याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असून, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.”
त्यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व पुनर्बांधणी करणे
पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था
रस्त्याची समतोल लेव्हलिंग करणे
श्री. कांबळे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर लवकरात लवकर योग्य उपाययोजना झाली नाही, तर नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो. आम्ही प्रशासनाकडे तातडीच्या निर्णयाची अपेक्षा करत आहोत.”
या परिसरातील नागरिक, समाजसेवक, महिला मंडळ आणि तरुण कार्यकर्त्यांनीही या मागणीला जोरदार पाठींबा दिला आहे. आता पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन तातडीची कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– सुनिल कांबळे सचिव, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), पिंपरी चिंचवड

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
