


पिंपरी, दि. २५ जून २०२५- पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष, माजी खासदार,आमदार दिवंगत आण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस तसेच प्रांगणातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त आण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उपलेखापाल अविनाश ढमाले , विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिल भालसाखरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेच्या जडणघडणीत पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. शहरातील पायाभूत सुधारणा आणि मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. नागरिकांसाठी विस्तृत रस्ते,पाणीपुरवठा,शाळा सार्वजनिक दवाखाने, उद्याने,वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या दूरदृष्टी विचारातून दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️