


जागतिक बालकामगार विरोधी दिनी कष्टकरी कामगारांच्या पाल्यांचा संकल्प

World Anti-Child Labor Day 2025
पिंपरी दि.१२ : महाराष्ट्र राज्यातील कामगार, कष्टकरी वर्गाची परिस्थिती बेताची, नाजूक असल्यामुळे इच्छा असतानाही कामगार स्वतः शिक्षण घेऊ शकलेले नाहीत. मात्र यापुढे पाल्यांना, बालकामगार, कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क हा मिळालाच पाहिजे. म्हणून हालाखीची परिस्थिती असो किंवा नाजूक असो आता इथून पुढे मुलांना कसल्याही परिस्थितीत शिकवण्याचा संकल्प आज सर्व असंघटित कामगारांनी केला.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलू कामगार समन्वय समिती, बांधकाम कामगार समिती तर्फे बालकामगार विरोधी दिनी बाल कामगार रोखण्याचे आवाहन केले “डोक्यावर पाटी नको हातात वही पेन देऊ”, “त्यांच्या हस्ती पुस्तके द्या काम नाही”, “बालमजुरीला आळा; बालमजुरी टाळा”, “मुलांचा हक्क शिक्षण”, “नको काम..हवे शिक्षण” , “मुलांना शिकवा ; मुलांना घडवा” , “शिक्षण हवे ; काम नव्हे” , “बालमजुरी टाळू शिक्षण देऊ” असे फलक हातात घेऊन घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राजेश माने, विनोद इंगळे, अनिल जाधव, सलीम डांगे, देवराव बिडगर, फरीद शेख, सविता वनवे, आम्रपाली भरडे, वैशाली घुगे, पुनम मंजुळ, गजानन गावंडे, युवराज मोरे, अजित पोहरे आदी उपस्थित होते.
जागतिक बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश सफल व्हावा. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) ने केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
नखाते म्हणाले की, भारतात बाल कामगारांची संख्या काही प्रमाणात आजही आहे. भारतात बाल कामगारांची सुद्धा तस्करी केली जात होती. यासाठी १९८६ मध्ये पहिला बाल कामगार बंदी आणि नियमन कायदा करण्यात आला.
या कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना मजुरी करणे बेकायदेशीर ठरविले गेले. याद्वारे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद २३ मुलांना धोकादायक उद्योग आणि कारखान्यांमध्ये काम करण्यास परवानगी देत नाही. तर कलम ४५ अंतर्गत देशातील सर्व राज्यांना १४ वर्षाखालील मुलांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी व विशेषत: कामगारांनी याची जनजागृती करत आपल्याला पाल्याला शिकवण्याचे ध्येय ठेवावे असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️