


पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

मुंबई, दि. ३० – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून दि. ३१ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जनतेमध्ये सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क अशा कितीतरी समाजसुधारकांचे कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अधिनस्त संस्थांमध्ये परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करणे, मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सून पूर्व लसीकरण करणे, पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे / कोकरे मरतूक कमी करणेबाबत उपाययोजना करणे, मेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर / परिसंवादाचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त महामंडळाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महामंडळाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधता येऊन शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल. तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल”, असा विश्वास व्यक्त करत मा. मंत्री, पशुसंवर्धन ना. श्रीमती पंकजा मुंडे यांनी उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी निर्देश दिले आहेत.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️