


चिंचवडमध्ये रंगले कविसंमेलन

चिंचवड, ता. २९: कविता हा साहित्याचा आत्मा आहे. साहित्य वाचनाने विचार प्रगल्भता वाढते. जगण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हा बदल स्वागतार्ह असतो कारण जगण्यात वेगळेपण येतं. आनंद येतो आणि या आनंदाच्या वाटेवर कविता असतील तर आनंद द्विगुणित होतो म्हणून कविता हे आनंदी जगण्याचे उत्तम माध्यम होय असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष बकुळगंधकार राजन लाखे यांनी केले.
निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आणि आनंद ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित कविसंमेलन जे साहित्यिकांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, उपाध्यक्ष, ए. जी. नागणे, पाहुणे डॉ. दिगंबर इंगोले तसेच राजाभाऊ गोलांडे उपस्थित होते.
अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यात आले.
देशभक्ती, आयुष्य, झाडे, शब्द, पाऊस, पर्यावरण, निसर्ग, वेळ आदी विविध विषयांवर कविता सादर होताना रसिकांकडून मिळालेली उत्स्फूर्त दाद यामुळे कविसंमेलनाला अधिक रंगत आली.
सदर कविसंमेलनात जयश्री श्रीखंडे, योगिता कोठेकर, रजनी दुवेदी, अशोक होनराव, अस्मिता कुलकर्णी, प्रा. शांताराम सोनार, नागेश गव्हाड, सीमा गांधी, अनिल कुलकर्णी, तेजश्री देशपांडे, कैलास भैरट, अश्विनी कोटस्थाने, दत्तात्रय म्हस्के, हेमांगी बोंडे, दत्तात्रय पुजार, हेमंत जोशी, डॉ. अनुपमा जाधव, सौ सुनीता बोडस, प्रकाश परदेशी, शोभा जोशी, किरण जोशी यांनी सहभाग घेतला.
डॉ. दिगंबर इंगोले आणि गोलांडे यांनी मनोगत व्यक्त करताना अशा साहित्यिक कार्यक्रमांनी वैचारिक भरणपोषण असल्याचे सांगून संस्थेला शुभेच्छा दिल्या. खेडकर यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र झेंडे, नृसिंह पाडुळकर, शशांक देशपांडे यांनी संयोजन केले.
स्वाती काकडे यांनी सूत्र संचालन केले तर सौ. कलाल यांनी आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️