


पिंपरी, ता. १३ -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ कृष्णानगर अंतर्गत येणाऱ्या अजंठा नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. येथील शौचालयाला जोडण्यात आलेले शासकीय नळ बंद स्थितीत असून दरवाजेही मोडकळीस आले आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबीयांची गैरसोय होत आहे.

अजंठा नगर येथील सार्वजनिक शौचालयात पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काहींना दरवाजेच नाही, तर काही ठिकाणी दरवाजे मोडकळीस आले आहेत. शौचालयातील नळ बंद असल्याने नागरिकांना घरूनच बकेटमध्ये पाणी न्यावे लागते. एवढेच नव्हे तर शौचालयाच्या बाजूला बांधण्यात आलेला हौदही कोरडा पडलेला आहे.
त्या ठिकाणी लाईटचे व्यवस्था नाही.पुरुष आणि महिलांसाठी १२ शौचालये असून त्यापैकी काही शौचालयांचे भांडे फुटलेले आहेत. दैनंदिन सफाई करणारे कर्मचारी व्यवस्थित सफाई करत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही काम झालेले नाही. संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ठेकेदार काम करायला तयार नाहीत
सदर शौचालय दिवसातून चार वेळा साफसफाई व्हावे असा नियम असताना दिवसातून एकदाही नीट होत नाही, महापालिका ठेकेदारांना पोसण्याचा ठेका घेतला आहे का? काम न करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई का होत नाही? यामध्ये आर्थिक हितसंबंध दडलेला आहे का? असा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रभाग ११ कृष्णा नगर परिसरातील सर्व शौचालयांचे सर्वेक्षण करून संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी व शौचालय स्वच्छ राहण्यासाठी उपाययोजना करावे. अशी मागणी शिवानंद चौगुले यांनी केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
