


रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ बंद करा

पिंपरी,ता. ५: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील गैरसोय दूर करून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ तात्काळ बंद करण्याची मागणी प्रदीप म्हस्के यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
संत तुकाराम नगर,पिंपरी येथे चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय असुन हे रुग्णालय शहरातील नव्हे तर शहरा बाहेरून येणाऱ्या हजारो रुग्णांसाठी देखील एक आशेचा किरण आहे..
आज घडीला खासगी रुग्णालयातील आरोग्य सेवेचे दर गगनाला भिडले असुन सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.
अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संत तुकाराम नगर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्य विषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे समजले जाते..
यामुळे रुग्णालयात सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. असे असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
या रुग्णालयातील अतिदक्षता विभागांची अवस्था पाहिली तर महापालिका प्रशासनाला रुग्णांच्या जीवाचे काही देणे घेणे नसून केवळ नाममात्र पद्धतीने हे रुग्णालय सुरू ठेवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे असे चित्र आहे.
या रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील डॉक्टर व डॉक्टरांसह इतर सर्व कर्मचारी हेइंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये नाही तर इंटेन्सिव्ह केअरलेस युनिट मध्ये काम करीत असल्यासारखे अत्यंत बेजबाबदार पद्धतीने वागताना दिसून येत आहेत…
अतिदक्षता विभागात डासांचा वावर असुन अतिदक्षता विभागात वापरात असणाऱ्या ई.सी.जी व एस. पी. ओ 2 मशिन्स अचुक परिणाम दर्शवत नसल्याचे याचाच अर्थ नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
डॉक्टरांना या बाबत विचारणा केली असता ‘डोन्ट ट्रस्ट द मशीन’ असे प्रतिउत्तर ऐकण्यास मिळते तसेच ही यंत्रे पालिका पुरवते त्याचा आणि आमचा संबंध नाही असे डॉक्टर सांगताना दिसतात..
उपरोक्त परिस्थिती रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील शल्य चिकित्सा आय.सी.यू 2 ची असुन इतर आय.सी.यू संदर्भात देखील हीच परिस्थिती कायम असण्याची शक्यता नाकारता येत नाही…
या व्यतिरिक्त इतर परिस्थिती तर आणखीनच गंभीर असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे.
आय. सी. यु मध्ये रुग्णांच्या देखभालीची जबाबदारी ज्या डॉक्टरांवर आहे ते डॉक्टर देखील शिकाऊ व अल्प अनुभवी अशा स्वरूपाचे आहेत सिनियर्स व तज्ञ डॉक्टरांच्या केवळ फोनवरील सल्ल्यानुसार ते आय.सी.यू.मधील रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सकाळी आणि संध्याकाळी याच शिकाऊ डॉक्टरांचा भरणा आय.सी.यू मध्ये दिसून येतो तज्ञ व सिनियर डॉक्टर क्वचित या ठिकाणी भेट देतात.. हे शिकावु डॉक्टर अतिदक्षता विभागातील रुग्णावर प्रायोगिक तत्त्वावर उपचार करताना देखील दिसून येतात..डॉक्टर व्यतिरिक्त अंतर्गत कर्मचारी देखील आपली जबाबदारी तत्परतेने करताना दिसून येत नाहीत.
डॉक्टर व कर्मचारी यांच्यामध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी या आय.सी.यू मध्ये होतात..एकंदर संपुर्ण बाब ही अत्यंत गंभीर असुन ज्या ठिकाणी रुग्णाला अतिदक्षतेची आवश्यकता असते अशा ठिकाणी हा बेजबाबदारपणा रुग्णाच्या जीवावर नक्कीच बेतत असून या मुळे या रुग्णालयातील आय.सी.यू.मधील मृत्यू दरात निश्चितच वाढ झाल्याचे माझे मत आहे.विशेषतः यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून ही परिस्थिती अधिक वाईट झाली असुन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याअगोदर आय.सी.यू ची परिस्थिती तुलनेने अधिक चांगली व तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली होती.
या मुळे सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांस विनंती की आपण तात्काळ या मध्ये लक्ष घालुन ही असुविधा दूर करावी व आय. सी. यू मध्ये शिकावू व अल्प अनुभवी डॉक्टरांना मज्जाव करून तज्ञ डॉक्टरांचा समावेश करावा जेणे करून नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ बंद होईल. असे निवेदनात प्रदीप राजेंद्र मस्के म्हंटले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️