


पिंपरी, ता. २५: पर्यावरण संरक्षण गतिविधि, पुर्णम इको व्हिजन फाउंडेशन, महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ई-यंत्रण २०२५’ हे ई-कचरा जनजागृती आणि संकलन अभियान आयोजित केले आहे. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये २०३ संकलन केंद्रे उभारली आहेत, जेथे तुम्ही ई कचरा म्हणजेच नादुरुस्त मोबाईल, चार्जर, हेडफोन्स, कॉम्प्युटर, लॅपटॉप मिक्सर, टीव्ही, फ्रीज इत्यादी आणून जमा करू शकता.

२४ जानेवारीला शाळा, कॉलेज आणि कार्पोरेट कंपन्यांमध्ये आणि २६ जानेवारीला दुकाने, कार्यालये, रहिवासी संस्था आणि इतर ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी १ या कालावधीत ई-कचऱ्याचे संकलन केले जाईल.
या मोहिमेत प्रामुख्याने निवासी गृहरचना, दुकाने, व्यावसायिक ठिकाण, मंडळ, मंदिरे व शाळा सहभागी झाल्या आहेत. जमा होणाऱ्या ई कचरा याचे वर्गीकरण करून दुरुस्त करण्याजोगे असेल ते गरजू संस्थांना दान करण्यात येईल व शिल्लक राहिलेले पुनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्यात येईल.
मागील वर्षी “इ यंत्रण २०२४” एकूण ७२ संकलन केंद्र मिळून २१०० किलो इ कचरा जमा केला होता. यावर्षी जवळपास ४००० किलो इ कचरा गोळा करण्याचे उद्दीष्ट आहे. अशी माहिती या मोहिमेचे प्रमुख श्री मणेश म्हस्के (पर्यावरण संरक्षण गतिविधि, पिं चिं जिल्हा स्वयंसेवी संस्था प्रमुख) यांनी दिली.
आपल्या शहरातील नजीकचे संकलन केंद्र पाहण्यासाठी दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
