


पिंपरी, ता. ५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टाळगाव चिखली येथे गुरुवार दि.२८/११/२०२४ ते शनिवार ३०/११/२०२४ रोजी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्रिदिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज मोरे, (अध्यक्ष जगगुरु संत तुकाराम महाराज संस्थान, देहू) जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प. रोहिदास महाराज मोरे (अध्यक्ष टाळगाव प्रासादिक दिंडी, चिखली) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित चरित्र कथा आणि संगीत नाटिका सादर करण्यात आली. महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राचे वर्णन केले.
विद्यार्थ्यांनी ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ आणि ‘आले लोटांगणी चांगदेव’ या नाटिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तिसऱ्या दिवशी भजन सम्राट पं. बाळासाहेब वायकर, दरबारी गायक पं. जगन्नाथ वाडेकर पंढरपूर मृदंग महर्षी पं. केशवजी जगदाळे (बीड) यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले. संतपीठातील शिक्षकांनी ‘बाप ज्ञानेश्वर समाधिस्त’ या नाटिकेचे सादरीकरण केले.
या सादरीकरणामुळे प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. दररोज पालकांच्या हस्ते आरती घेण्यात आली.संगीत साथ गायक विलास कोकाटे, श्रुती तनपुरे, हार्मोनियम वादक चंद्रकांत गोसावी, सिंथ वादक नेहा नाफडे, तबला वादक विवेक भालेराव, पखवाज वादक अविनाश भोगिल आणि महेश शेळके यांनी त्यांच्या विशेष योगदानाने समारंभाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्यडॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांनी केले. संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
