


सोसायटी व वस्ती परिसर तहानलेला

मोशी, ता. १ – गेल्या दोन महिन्यापासून चऱ्होली गावावर पाण्याचे संकट ओढवले आहे. एकीकडे धो-धो पाऊस पडूनही तसेच धरणात पुरेसा पाणीसाठा होऊन देखील या भागातील मोठ्या सोसायट्या व वस्त्या अद्याप पर्यंत तहानलेल्याच आहेत. सध्या नागरिकांनी पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चऱ्होली या नव्याने विकसित होणाऱ्या भागात बांधकामाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. या भागात बांधकामासाठी सर्रास परवानग्या दिल्या जात आहेत. त्याकरिता बांधकाम परवानगीला चाप बसणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. चऱ्होली भागांतील ताजने मळा, बुरडे वस्ती, खडकवासला वस्ती, थोरवे वस्ती, मोरया नगर, लक्ष्मी नारायण नगर, साईनगर या भागातील वस्ती परिसर व रविकिरण, अक्षय सृष्टी, अलंकापुरम, यशोभूमी, स्प्रिंग व्हॅली या सोसायटीमध्ये सध्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. नागरिकांना यामुळे लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असून घर चालवणे दिवसेंदिवस कठीण होऊ लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आमच्याकडे पाणी खूप कमी दाबाने येते. या भागात लोकवस्तीचा विस्तार झाला आहे. पाणी मोठ्या दाबाने जरी आले तरी देखील पाण्याच्या टाकीची क्षमता नाही. या भागासाठी स्वतंत्र पाण्याची टाकी हवी. अनेकदा नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. पाण्याच्या टाकीचे काम अद्याप पर्यंत झालेले नाही.
– रोहिणी रासकर, बुर्डे वस्ती
महानगरपालिकेचे नळजोड आम्हाला आहेत. परंतु नळांना पाणीच येत नाही. सध्या एक थेंब देखील पाणी नाही. पिण्याचे पाणी व वापरण्याचे पाणी बाहेरून विकत आणत आहोत. बोअरवेलचे पाणी आटले असून सध्या गाळमिश्रित पाणी आम्हाला येत आहे.
– पूनम जगताप, रहिवाशी
गेले दोन वर्षापासून आम्हाला पाणी नाही. सध्या टँकर बोलवत असून त्याचा खर्च आम्हाला परवडत नाही. सोसायटीत एकूण 139 फ्लॅट आहेत. टँकरसाठी मे महिन्यामध्ये आम्हाला दोन लाख 49 हजार इतका खर्च आला आहे. जून महिन्यामध्ये दीड लाख इतके बिल आले आहे. गेले तीन दिवस पुन्हा टँकर सुरू झाले आहेत. दहा हजार लिटरचा टँकर एक हजार रुपयाला आहे. आमचा पाण्यावरती लाखो रुपये खर्च होत आहे.
नितीन पावे, सृष्टी होम्स सोसायटी, वडमुख वाडी
बांधकाम परवानगी देताना मानांकाप्रमाणे जेवढे पाणी द्यायचे तेवढी परवानगी दिली आहे. शेवटी उर्वरित पाणी पुरविण्याची जबाबदारी बिल्डरांची आहे. प्रमोद ओंबासे, सहशहर अभियंता, महापालिका चऱ्होलीचा काही भाग उंच सखल आहे. या भागात विकासही मोठ्या प्रमाणावर सध्या होत आहे. भामा आसखेड प्रकल्प सुरू झाल्यास अडचणी येणार नाही. काही अंशी पाण्याच्या अडचणी येत आहेत. ज्या भागात पाणीच येत नाही अशा भागात आम्ही पाहणीसाठी अधिकारी पाठवतो.- विजयसिंह भोसले, कार्यकारी अभियंता, महापालिका
भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा झाल्याशिवाय समाविष्ट चऱ्होली गावाची तहान भागणार नाही. अन्यथा चातक पक्षासारखी वाट पहावी लागेल. सोसायट्यांना टँकरचा भूर्रदंड सहन करावा लागेल. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना रोज नियमित पाणीपुरवठा व्हायला हवा.
– विनया तापकीर, नगरसेविका, चऱ्होली

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️