


जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल कर्मचारी व पोस्टमन यांचा सन्मान

पिंपरी, दि. ९ : पूर्वी घराघरांत सुख-दुःखाचे निरोप पोहोचवणारी पत्रे आणि महत्त्वाचे संदेश घेऊन येणाऱ्या पोस्टमनची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असे. पोस्टमन दारात येताच निर्माण होणारे कुतूहल, उत्सुकता आणि आनंद आजही अनेकांच्या आठवणींत कायम आहे. लाल रंगाची टपालपेटी आणि खाकी वर्दीतील पोस्टमन यांचे नाते विसरणे अशक्य आहे. जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रामाणिक आणि कष्टाळू टपाल कर्मचारी व पोस्टमन बांधवांचा निगडी प्राधिकरण येथे शाल, श्रीफळ, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला होता.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी टपाल कर्मचाऱ्यांच्या अविरत सेवाकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, डिजिटल युगातही टपाल खात्याचे महत्त्व कमी झालेले नाही. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता प्रत्येक घरापर्यंत पत्रे, पार्सल आणि विविध शासकीय सेवांशी संबंधित कागदपत्रे पोहोचविण्याचे काम पोस्टमन बांधव अत्यंत निष्ठेने करत आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता त्यांनी नागरिकांना सेवा दिली. त्यांच्या या समर्पित कार्याचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे.
पुढे नखाते म्हणाले की, आज व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ई-मेल यांसारख्या डिजिटल माध्यमांमुळे काही सेकंदांत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संदेश पोहोचविणे शक्य झाले आहे. मात्र, टपाल खात्याची विश्वासार्हता आणि पोस्टमनचे नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आजही टिकून आहे. टपाल कर्मचारी केवळ पत्रे आणि पार्सल पोहोचवत नाहीत, तर अनेक महत्त्वाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कामही करतात.
“तंत्रज्ञान बदलले, संवादाची साधने बदलली; पण टपाल कर्मचाऱ्यांची सेवाभावना आणि कर्तव्यनिष्ठा आजही कायम आहे. ऊन-पावसाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या पोस्टमन आणि टपाल कर्मचाऱ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या श्रमांचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव आहे,” असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
या सन्मान सोहळ्यात टपाल कर्मचारी आणि पोस्टमन बांधवांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सन्मानाबद्दल पोस्ट कर्मचारी यांनी महासंघाचे आभार व्यक्त केले.
यावेळी उप पोस्ट मास्तर कृष्णकुमार केंगार, टपाल सहाय्यक रूपाली वाडेकर, महासंघाचे सहदेव होनमाने,इरफान चौधरी,मनोज यादव,पोस्टमन शीतल नागवे,अश्विनी जाधव,वर्षा सुभे, अनंत जाधव, सर्जेराव ठोंबरे, संतोष चव्हाण,संदेश गायकवाड,अमृत वाघमारे,घनश्याम पाटील, वैशाली कोल्हे, दत्तात्रय जाधव ,बापू डोळसे, लीना बेगमपुरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
