


पीसीएमसी अर्थसंकल्प २०२६:

पिंपरी चिंचवड, ता. २७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा २४ मार्च २०२६ रोजी पार पडली. स्थायी समिती अध्यक्षांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना नगरसेवक राहुल कलाटे यांनी प्रदूषण रोखण्यासाठी निधीच्या तरतुदीची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ९,३२२.१७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून, यामध्ये पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि आरोग्य क्षेत्रावर मुख्य भर आहे. तसेच या अर्थसंकल्पात मागील वर्षीच्या तुलनेत ४१४ कोटींची वाढ करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान राहुल कलाटे सभागृहात बोलत होते.
आपल्या निवेदनात कलाटे म्हणाले, “पुनावळे परिसरात धुळीमुळे वाढणारे प्रदूषण ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. शहरातील पाणी समस्येबरोबरच वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना आणि निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेने यापूर्वी केलेल्या उपाययोजनांची पाहणी-डागडुजी आवश्यक असल्याचे कलाटे यांनी आपल्या निवेदनात मांडले आहे. यावेळी ते म्हणाले, “महापालिकेने चौकाचौकात एयर प्युरिफायर बसवले होते मात्र त्यातील अनेक उपकरण सध्या सुस्थितीत नाहीत. भूमकर चौकात असलेले उपकरण बंद आहे.
त्यामुळे या उपकरणांची योग्य पद्धतीने तपासणी आणि मेंटेनंस आवश्यक असेल.” धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी धोरण आखताना बांधकाम परवानगी विभागालाही योग्य सूचना द्याव्या लागतील, असेही त्यांनी आयुक्तांना सुचवले.
“स्वच्छ हवा आणि मुबलक पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना आणि आर्थिक तरतूद करणे अत्यावश्यक आहे.”
- राहुल तानाजी कलाटे
नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
(२४ मार्च २०२६, पिंपरी चिंचवड महापालिका, अर्थसंकल्प सर्वसाधारण सभा)

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
