


एमएसआयएचएमसीटी (MSIHMCT) तर्फे आयोजन

पुणे, १७ मार्च २०२६: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत’ (QIP), महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (MSIHMCT, Degree), पुणे यांच्या वतीने ‘सायबर सुरक्षा आणि सायबर हायजीन’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र यशस्वीरित्या पार पडले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणे आणि वैयक्तिक व संस्थात्मक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण संचालक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. व्ही. एम. मोहितकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक आणि संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. डी. व्ही. जाधव तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा झगडे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सत्रे:
या चर्चासत्रात सायबर सुरक्षा क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले:
• पहिले सत्र: पीटीसी (PTC), पुणे येथील सॉफ्टवेअर सिक्युरिटी फेलो श्री. नितीन सावरकर यांनी ‘सायबर सुरक्षा आणि सायबर हायजीन’ या विषयावर मांडणी केली. त्यांनी मजबूत पासवर्ड, डेटा संरक्षण आणि दैनंदिन जीवनातील सायबर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.
• दुसरे सत्र: पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अलका जाधव यांनी ‘डिजिटल सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष घडलेल्या सायबर गुन्ह्यांचे दाखले देत ऑनलाइन फसवणूक, फिशिंग हल्ले आणि कायदेशीर तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती दिली.
• तिसरे सत्र: स्वतंत्र सायबर सुरक्षा सल्लागार आणि शिक्षक श्री. अभिजित लिमये यांनी ‘सोशल मीडियाचा जबाबदार आणि सुरक्षित वापर’ या विषयावर सत्र घेतले. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती कशी जपायची आणि सुरक्षित डिजिटल वर्तन कसे असावे, यावर त्यांनी प्रकाश टाकला.
•
प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या परिसंवादामध्ये 100 हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
गेल्या पाच दशकांपासून आदरातिथ्य (Hospitality) शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आधुनिक विषयांवरील उपक्रम राबवण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
