


पुनावळेत प्रभाग क्रमांक २५ च्या भाजप पॅनलचा दणदणीत प्रचारारंभ

पुनावळे, ता. ७ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) येथे भाजपच्या पॅनलने प्रचाराचा शुभारंभ पुनावळेतील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात मंगळवारी (ता. ६) सायंकाळी नारळ फोडून केला. श्रद्धा, संस्कृती आणि विकासाचा संकल्प घेऊन सुरू झालेल्या या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शुभारंभानंतर भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. “विकासासाठी अनुभव, सेवेसाठी समर्पण” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या पदयात्रेमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला अधिक वेग मिळाला.
पदयात्रेत उमेदवार श्रुती राम वाकडकर, राहुल कलाटे, रेश्मा चेतन भुजबळ व कुणाल वाव्हळकर यांच्यासह पुनावळे, ताथवडे, वाकड ग्रामस्थांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्रुती राम वाकडकर : विकासाचे विश्वासार्ह नेतृत्व :
या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरल्या भाजपच्या उमेदवार श्रुती राम वाकडकर सामाजिक कामातून ओळख निर्माण केलेल्या, सातत्याने नागरिकांच्या अडचणींसाठी रस्त्यावर उतरलेल्या आणि प्रशासनाशी थेट संवाद साधणाऱ्या श्रुती वाकडकर यांना “काम करणारी, ऐकणारी आणि उपाय देणारी कार्यकर्ती ” म्हणून ओळखले जाते.
पदयात्रेदरम्यान श्रुती वाकडकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, उद्याने आणि महिला–ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना या मुद्द्यांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “हा प्रभाग केवळ माझा मतदारसंघ नाही, तर माझं कुटुंब आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकसहभाग हाच माझा अजेंडा आहे,” असे त्या म्हणाल्या.
नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा :
पुनावळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि व्यापाऱ्यांनी पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी फुलांची उधळण, औक्षण आणि शुभेच्छांचा वर्षाव करत नागरिकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. “श्रुती वाकडकर या नेहमीच आमच्यातील आहेत, त्या केवळ निवडणुकीपुरत्या दिसत नाहीत,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली.
भाजप पॅनलचा विकासाचा निर्धार :
भाजप पॅनलने प्रभाग २५ साठी सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मांडत स्वच्छता, पायाभूत सुविधा, स्मार्ट सुविधा, शाळा-आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण आणि सुरक्षिततेवर भर देण्याचा निर्धार केला आहे.
या प्रचारारंभाने भाजपच्या पॅनलची संघटनशक्ती, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. श्रद्धेने सुरू झालेला हा प्रचार, विकासाच्या दिशेने निर्णायक वाटचाल ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रभाग २५ मध्ये भाजप आणि श्रुती राम वाकडकर यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा निवडणुकीच्या प्रचारात नवा उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
